मुंबई Rashmika Mandanna Deepfake : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाबाबत गेल्या वर्षी एक गंभीर प्रकरण समोर आलं होतं. तिचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रश्मिकानं तिचा हा डीपफेक व्हिडिओ पाहून दु:ख व्यक्त केलं होतं. यानंतर तिनं सोशल मीडियावर याविरोधात एक मोहीमही सुरू केली होती. रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक प्रकरणाचा अनेक दिवसांपासून तपास सुरू असून आता या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करून याप्रकरणावर त्याची चौकशी केली जात आहे.
रश्मिका मंदान्ना डीपफेक व्हिडिओ प्रकरण : रश्मिकाच्या डीपफेक या गंभीर प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 10 नोव्हेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल केला होता. आता एकाला अटक केल्यानंतर या आरोपीचे आणखी काही सायबर संबंधीचे गुन्हे समोर आले आहेत. या आरोपीनं एका वृद्ध महिलेला देखील डिजिटल पद्धतीनं त्रास दिला होता. 6 नोव्हेंबर 2023 रोजी दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स हँडलवर रश्मिकाचा हा डीपफेक व्हिडिओ शेअर करून चिंता व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी पोस्ट शेअर करत हे कृत्य लज्जास्पद असल्याचं म्हटलं होतं. यानंतर जेव्हा रश्मिका मंदान्नानं बिग बींची ही पोस्ट पाहिली तेव्हा ती घाबरली आणि तिनं स्वतः ही पोस्ट शेअर करून तिची भीती व्यक्त केली.
आरोपीला झाली अटक : रश्मिकानं एक पोस्ट शेअर करत लिहिलं होतं, ''माझा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि तो खूप भीतीदायक आहे. मला याबद्दल बोलताना खूप वाईट वाटत आहे. एआय केवळ माझ्यासाठीच नाही तर भविष्यात कोणासाठीही वाईट असू शकते. हा तंत्रज्ञानाचा गैरवापर आहे.'' रश्मिका मंदान्नाचा हा वादग्रस्त डीपफेक व्हिडिओ सोशल मीडिया युजर झारा पटेलच्या व्हिडिओवर बनवण्यात आला होता. या व्हिडिओत झारा जंपसूटमध्ये लिफ्टच्या बाहेर येताना दिसत होती. या आरोपीनं एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यावर रश्मिका मंदान्नाचा चेहरा जोडला होता. दरम्यान सायबर गुन्ह्यात जर कोणी दोषी सापडलं तर त्याला 2 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. याशिवाय आयटी कायद्याचे कलम 66डी अंतर्गत तीन वर्षांपर्यंत कारावास होतो.
हेही वाचा :