मुंबई - Shivaji Satam and digpal lanjekar : चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाकडून ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मानाच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. मराठी-हिंदी चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ आपलं योगदान देणाऱ्या तसंच या क्षेत्रात अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन अशा गुणांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलावंतांना राज्य शासनाच्या या पुरस्कारांनी गौरवण्यात येतं.
चित्रपटसृष्टीतील विशेष योगदान : सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याच्या एक्स अकाउंटवर यासंबंधित पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "चित्रपटसृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहीर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३, ज्येष्ठ अभिनेते श्री. शिवाजी साटम यांना आणि स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर करत आहोत. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३, लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता श्री. दिग्पाल लांजेकर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३, ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन.चंद्रा यांना जाहीर करत आहोत. या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.!! राज्याचा सांस्कृतिक गौरव सतत उंचावत राहावा. आई भवानीनं तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य आणि उदंड यश द्यावे या शुभेच्छा."
चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहिर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे.
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) August 14, 2024
चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेते श्री.शिवाजी साटम यांना आणि स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ…
शिवाजी साटम आणि एन. चंद्रा यांची प्रतिक्रिया : या कलाकारांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान अभिनेता शिवाजी साटम यांनी या सन्मानाबाबत ईटीव्ही भारतला एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "राज्य सरकारचा मोठा पुरस्कार मिळाल्यानं आनंद झाला. १९७५ ते आजवर कला क्षेत्रात आनंद घेत खेळलो-बागडलो आहे. ओढून ताणून कधी काही केलं नाही. त्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे. राज्य सरकारकडून खूप मोठा पुरस्कार मिळाल्यानं खूप अभिमान वाटत आहे. चाळीतला माझा जन्म आहे. पण, यश मिळवण्यासाठी मी सॉलिड प्रयत्न केल्याचं स्वप्नातही सांगणार नाही. नाटकात मराठी, हिंदीत आणि इंग्रजीत काही चित्रपटात भूमिका केल्यात. राज्य सरकारनं खूप कौतुक केलं आहे. मात्र, आपल्याला फॉर्मिलिटीमध्ये ते सांगायला जमत नाही."
खूप छान वाटतयं. आपण ज्यांना मॉडेल म्हणून पाहात आहे, त्यांच्या नावानं पुरस्कार मिळणं, ही आनंदाची गोष्ट आहे. राज्य सरकारनं राज कपूर विशेष योगदान पुरस्कार दिल्यानं आपण करत असलेल्या कष्टाचं चीज झाल्याचं वाटतयं - लेखक, दिग्दर्शक, दिग्पाल लांजेकर
राज कपूर यांच्या सिनेमाप्रमाणं माझ्या चित्रपटाची जातकुळी - दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं, "राज्य सरकारचा पुरस्कार मिळणं हा सुखद धक्का आहे. या पुरस्काराची अपेक्षा केली नव्हती. राज कपूर हे माझे आदर्श आहेत. राज कपूर साहेबांनी सामाजिक प्रश्न, विषमता मांडण्याबरोबरच प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मी तसे प्रयत्न केले. त्यांच्या नावानं पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी गुलजार यांच्याकडे लिहिणं शिकलो. पण, गिरणगावमध्ये जन्मल्यानं माझी चित्रपटाची जातकुळी त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. गुलजार यांच्याकडून लिहिणे शिकलो. मात्र दुसऱ्याचं आयुष्य रिप्लीकेट राहून जगता येत नाही. माझी चित्रपटाची जातकुळी राज कपूर यांच्या सिनेमाप्रमाणं आहे. मला पुन्हा एकदा सिनेमा करायचा आहे."
शिवाजी साटम यांची मराठी प्रेक्षकांच्या मनावर छाप- "ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांनी रंगभूमी आणि अनेक चित्रपटात काम केलं आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्यामुळे उशिरा का होईना, पण त्यांच्या अभिनयाची दखल घेऊन या शासनाने पुरस्कार दिला आहे. याबद्दल मी अभिनेते शिवाजी साटम यांचं अभिनंदन करतो. सरकारचेही आभार मानतो," अशी प्रतिक्रिया अभिनेते आणि शिवसेना (शिंदे) चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
या सरकारकडून कलाकारांना न्याय - "याव्यतिरिक्त स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना मिळाला आहे. आशा पारेख हे चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. मी खूप छोटा अभिनेता आहे. पण त्यांच्याही कामाची दखल घेऊन सरकारनं त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे. तसेच लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनाही राज कपूर विशेष योगदान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लांजेकर यांनी इतिहासकालीन माहिती सांगणारे अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील माहिती आताच्या पिढीसमोर आणली आहे. या तिघांचेही मी अभिनंदन करतो. हे पुरस्कार आधीच्या सरकारमध्ये देणे अपेक्षित होते. परंतु आत्ताच्या सरकारने या सर्व कलाकारांची दखल घेऊन त्यांना न्याय दिला आहे. त्यांचा सन्मान केला आहे," अशी प्रतिक्रिया अभिनेते आणि शिवसेना (शिंदे) चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली आहे.
बातमी ऐकून आनंद होतोय... - "ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांनी नाटक, सिनेमा आणि मालिका अशा माध्यमातून त्यांनी अभिनयाच्या छटा दाखवल्या आहेत. प्रत्येकवेळी त्यांच्या अभिनयामध्ये एक वेगळेपण असते. शिवाजी साटम म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर पोलीस उभा राहतो. परंतु पोलिसाव्यतिरिक्त त्यांनी अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटातून काम केलं आहे. त्यांच्याही कामाची दखल सरकारनं घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे. याव्यतिरिक्त इतिहासकालीन चित्रपटाची निर्मिती करणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. या तिघांचेही मी अभिनंदन करतो. हे पुरस्कार राज्य शासनाकडून मिळत असल्यामुळे मला निश्चितच आनंद होत आहे," अशी प्रतिक्रिया अभिनेते, निर्माते मंगेश देसाई यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
आशा पारेख यांनी चार दशके गाजविली चित्रपटसृष्टी- आशा पारेख या प्रसिद्ध अभिनेत्री, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्यांनी आपल्या अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीतून चार दशके चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविलं. त्यांनी 85 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांची चित्रपटसृष्टीतील योगदान लक्षात घेऊन भारत सरकारनं 1992 मध्ये पद्मश्री तर 2020 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कटी पतंग, तिसरी मंझील आणि कारवां सारख्या अनेक हिंदी चित्रपटांमधील भूमिकांमधून त्यांनी स्वत:चा प्रेक्षकवर्ग निर्माण केला.
ACP प्रद्युम्नमुळे जगभरात चाहते- शिवाजी साटम यांनी परळच्या महर्षी दयानंद कॉलेजमधून रसायनशास्त्रात पदवी घेतली आहे. सीआयडीमधील ACP प्रद्युम्नच्या भूमिकेमुळे त्यांचे जगभरात चाहते आहेत. त्यांनी वास्तव, गुलाम-ए-मुस्तफा, यशवंत, चायना गेट, टॅक्सी नंबर 9211, नायक, जिस देश में गंगा रहता है अशा विविध हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. उत्तरायण या मराठीमधील त्यांचे भूमिकेचं विशेष कौतुक झालं होतं. त्यांची मराठीमधील एक शून्य शून्य ही मालिकादेखील गाजली होती. उत्तम इंग्रजी आणि अभिनयामुळे त्यांनी इंग्रजीतील चित्रपटातही भूमिका साकारल्या आहेत.