मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला. यासाठी तो अभिनेत्री माधुरी दीक्षितसह पुण्यात आला होता. कलाकारांबरोबर आलेल्या 'भूल भुलैया 3' च्या टीमनं इथं वडा पावचा मनमुराद आनंद लुटला आणि पुण्यातला प्रेक्षकांशी संवादही साधला.
कार्तिकने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो आणि माधुरी दोघेही वडा पाववर ताव मारताना दिसत आहेत. "ये दिवाळी भूल भुलैया वाली" म्हणत त्यांनी चित्रपटाचे प्रमोशन केले. मराठीतूनही प्रेक्षकांशी संवाद साधत माधुरीनं धमाल केली. यावेळी कार्तिकने बॅगी पँट, टी-शर्ट आणि ओव्हरसाईज जॅकेटसह आपला पोशाख कॅज्युअल ठेवला होता. तर माधुरी दीक्षित लाल सलवार कुर्त्यामध्ये देखणी दिसत होती. माझ्या मंजूबरोबर वडापाव डेटिंग करत असल्याचं कॅप्शन या पोस्टला कार्तिकनं दिलं आहे.
'भूल भुलैया 3' मधील 'अमी जे तोमर 3.0' हे गाणं रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. हे गाणं श्रेया घोषालने गायलं असून, समीरचे बोल आणि अमाल मल्लिकचे संगीत या गाण्याला लाभलंय. या गाण्यातून माधुरी दीक्षित आणि विद्या बालन सामना पाहायला मिळणार आहे. विद्या बालन आणि माधुरी एकाच चित्रपटात झळकत असल्यामुळे दोघांच्याही चाहत्यांसाठी ही मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे.
अनीस बज्मी दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित, 'भूल भुलैया 3' हा हॉरर आणि कॉमेडी प्रेक्षकांच्या मनोरजंनासाठी सज्ज आहे. यामध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ती दिमरी हे कलाकार आहेत. यंदाच्या दिवाळीला रिलीज होणाऱ्या सिनेमामध्ये हे सर्वात मोठं आकर्षण असणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी प्रीमियर होत असलेला 'भूल भुलैया 3' हा चित्रपट रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर भिडणार आहे. दरम्यान, रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स चित्रपट 'सिंघम अगेन' चित्रपटात अजय देवगण, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांच्या भूमिका आहेत.