मुंबई - दर वर्षी 28 सप्टेंबरच्या सुर्योदयानंतर अगदी पहिल्या कोवळ्या किरणांपासूनच जगभरातील संगीत प्रेमी रसिक स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सूरांचं मनोभावे स्मरण करतात. 1929 मध्ये मध्य प्रदेशांतील इंदूर येथे जन्मलेल्या, लता मंगेशकर यांचे सुरेल योगदान सात दशकांहून अधिक काळ संगीत जगतावर आधिराज्य गाजवत राहिलंय. यामुळेच पार्श्वगायनाच्या क्षेत्रातील त्या एक महान व्यक्तीमत्व ठरतात.
लता मंगेशकर यांचा जन्म संगीताचा समृद्ध वारसा लाभलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे एक प्रख्यात शास्त्रीय संगीतकार होते आणि संगीताच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या समग्र कारकिर्दीचा पाया घातला गेला. अगदी तरुण वयातच त्यांनी गायन प्रवासाला सुरुवात करुन त्या काळातील पुरुषप्रधान संगीत उद्योगात अनेक आव्हानांचा मुकाबला केला. वाटेत येणाऱ्या सर्व अडथळ्यांना न जुमानता, त्यांच्यातील संयम, चिकाटी आणि उत्कटता भाषिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून असंख्य चित्रपटांचा आवाज बनली.
1949 मध्ये 'महल' चित्रपटातील 'आयेगा आयेगा आयेगा' या गाण्यानं त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला. पण पुढे जाऊन संगीतकार नौशाद यांच्या सहकार्यानं त्यांना खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळवून दिली. 'प्यार किया तो डरना क्या' आणि 'अजीब दास्ताँ है ये' सारखे आयकॉनिक गाणी क्लासिक बनली. अंतरीच्या भावना व्यक्त करण्याची आणि प्रेक्षकांच्या हृदयाला जाऊन भिडण्याची किमया या काळात त्या सिद्ध करत राहिल्या.
लता मंगेशकरांची शास्त्रीय आणि लोककलेपासून ते गझल आणि पॉपपर्यंत अनेक शैलींमध्ये गाणी आहेत. आर.डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि ए.आर. रहमान यांसारख्या प्रख्यात संगीतकारांबरोबर त्यांनी गायन केलं. संगीत प्रेमींच्या नव्या पिढीशी जुळून घेताना त्यांनी कालातीत क्लासिक्समध्ये केलेलं गायन हे प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. 'लग जा गले', 'जिया जले' आणि 'तुझे देखा तो' यांसारख्या गाण्यांनी केवळ पिढ्याच मंत्रमुग्ध केल्या नाहीत तर पार्श्वगायनासाठी एक मैलाचा दगड प्रस्थापित केला.
लता मंगेशकर यांच्या गायनातील अष्टपैलुत्वामुळे त्यांनी नर्गिस आणि मधुबालापासून करीना कपूर आणि ऐश्वर्या रायपर्यंत विविध काळातील अभिनेत्रींना आपला आवाज देण्याची किमया साधली. प्रत्येक गायनातून श्रोत्यांच्या हृदयावर अमिट छाप सोडत पात्राच्या भावनांना मूर्त रूप देण्याची क्षमता त्यांनी जगाला दाखवून दिली.
लता मंगेशकरांच्या सूरांचा प्रभाव हिंदी चित्रपटसृष्टीपलीकडेही पसरत गेला. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली आणि काही परदेशी भाषांसह 36 हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यामुळेच त्या भारतीय संगीताच्या जागतिक राजदूत बनल्या आणि जगभरातील सर्व थरातील श्रोत्यांची प्रशंसा मिळवली. दुसऱ्यांसाठी कायम जिव्हाळा बाळगण्याची आणि प्रेम जपण्याच्या त्यांच्या अंगभूत गुणामुळे त्या प्रिय व्यक्ती म्हणूनही आणखी मजबूत बनल्या.
लता मंगेशकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. त्यांना 2001 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. पार्श्वगायनासाठी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार, आणि फ्रान्स सरकारचा लीजन ऑफ ऑनर हे त्यांना मिळालेल्या अनेक मान्यतांप्राप्त पुरस्कारांपैकी काही आहेत, ज्यामुळे त्यांचा सांस्कृतिक प्रतीक म्हणून दर्जा वाढला आहे
6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचं निधन झाल्यापासून, संगीत जगताला एक पोकळी जाणवत आहे. असं असलं करी त्यांचा संगीताचा वारसा जपणारी त्यांची गाणी पिढ्यानपिढ्या गाजत राहिली आहेत. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं जगभरातील त्यांचे चाहते आणि संगीतप्रेमी त्यांच्या स्मृती जपताना त्यांची कालातीत गाण्यांचं भक्तीनं श्रवण आणि गायन करतात. श्रद्धांजली म्हणून अनेक मैफिलींचं आयोजन केलं जात. लता मंगेशकर यांची जयंती हा केवळ त्यांच्या जीवनाचा उत्सव नाही, तर संगीतातील त्यांच्या विलक्षण योगदानाचं आणि त्यांच्या चिरस्थायी भावनेचं एक मधुर स्मरण आहे.