एकदा अमिताभ बच्चनला 'तुमचा आवडता अभिनेता कोण?' असे विचारले असता त्यांनी उत्तर दिले, 'विक्रम गोखले'. एकदा सचिन खेडेकर एका हिंदी चित्रपटाचं शूट करीत असताना त्यांनी बारा पानी शॉट वन टेक मध्ये दिल्यावर सर्व युनिट चाट पडलं होतं. नाना पाटेकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सोनाली कुलकर्णी, दिवंगत रीमा लागू, दिवंगत सुलभ देशपांडे, अतुल कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी सारखे अनेक मराठमोळे कलावंत हिंदीतही काम करीत आहेत/होते आणि त्यातील सर्वांना नाटकांची पार्श्वभूमी आहे. अनेक दिग्दर्शक मराठी कलाकारांना झुकते माप देतात कारण त्यांना त्यांच्यावर 'अतिरिक्त मेहनत' करावी लागत नाही. मराठी कलाकारांना हिंदी मनिरंजनसृष्टीतही मानसन्मान मिळतो कारण हे सर्व 'तयार' कलाकार समजले जातात, यांच्यामुळे फारसे रिटेक्स होत नाहीत. त्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे नाटक. मराठीत नाटकांची मोठी परंपरा आहे आणि आधीच्या काळातील प्रत्येक कलाकाराला नाटकांची पार्श्वभूमी असायची. टेलिव्हिजनच्या जमान्यात अनेक तरुण कलाकार यशाची पायरी चढले परंतु त्यातील अनेकांनी नंतर नाटकांचा रस्ता धरला कारण असं म्हटलं जातं की, अभिनय पक्का करायचा असेल तर नाटक करण्याशिवाय पर्याय नाही.
मराठी प्रेक्षक हा प्रामुख्याने नाटकवेडा. अनेक दशकांपासून तो नाटकांवर प्रेम करीत आला आहे. नाटक हे त्याचे पहिले प्रेम, त्यामुळेच आजही नाटकांना गर्दी होते ती त्याच प्रेमापोटी. आशयघनता आणि अप्रतिम अभिनय करणारे कलाकार ही मराठी नाटकाची बलस्थानं. चित्रपट आणि टेलिव्हिजन सिरिल्सच्या गराड्यात सापडूनही मराठी नाटक जिवंत आहे ते मराठी प्रेक्षकाच्या नाट्यप्रेमामुळे. जरी नवीन पिढी नाटकांसोबत जुळलेली नाही असं म्हटलं जात असलं तरी मराठी नाटकांनी कात टाकत नवीन तारुण्यभिमुख विषय आणि तरुण छोट्या व मोठ्या पडद्यावरील कलाकारांच्या सहभागामुळे तरुणाई देखील नाटक बघायला नाट्यगृहांत पोहोचत आहे. प्रत्यक्ष अभिनय अनुभवणं ही त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण पर्वणी असते तसेच कलाकारांना मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद त्यांना अजूनही चांगले काम करण्याची ऊर्जा देतो.
प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये नाटकांच्या जाहिराती मराठी नाटक जोमात आहे याची प्रचिती देतात. मराठी रंगभूमीवर नवीन नाटकं येतंच राहतात आणि चांगल्या कलाकृतीला प्रेक्षक पाठिंबा देत असतात. नवीन नाटकांसोबतच जुनी प्रसिद्ध नाटकं नवीन संचात पुनरुज्जीवित केली जाताहेत ज्यालाही प्रेक्षक-पाठिंबा मिळतोय. त्यातच निरनिराळ्या जॉनर ची नाटके रंगभूमीवर येत असल्यानं प्रेक्षकांना व्हरायटी देखील मिळत आहे. एकदम ताजेतवाने नाटक म्हणजे 'शिकायला गेलो एक' ज्यात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रशांत दामलेची प्रमुख भूमिका आहे. त्याच्याबरोबर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार ऋषिकेश शेलार आहे. 'ज्याची त्याची लव्ह स्टोरी' मध्ये टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध जोडी, सुयश टिळक आणि सुरुची आडारकर, प्रमुख भूमिकेत आहे. 'अ परफेक्ट मर्डर' या सस्पेन्स नाटकात प्रमुख भूमिका अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री व सतीश राजवाडे आलटून पालटून करतात.
संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'नियम व अटी लागू' हे नाटक तरुणाईच्या समस्यांवर आधारित असून तरुण प्रेक्षकवर्ग या नाटकाला गर्दी करतात. 'नकळत सारे घडले' या नाटकात आनंद इंगळे, डॉ श्वेता पेंडसे सारखे प्रथितयश कलाकार काम करताहेत. एकदम कोरं करकरीत नाटक म्हणजे 'असेन मी...नसेन मी'. हे नाटक अमृता सुभाषनं दिग्दर्शित केलं असून ती त्यात कामही करत आहे आणि तिच्या जोडीला आहेत दिग्गज अभिनेत्री, नीना कुलकर्णी आणि शुभांगी गोखले. रामायणातील लक्ष्मणाची उपेक्षित अर्धांगिनी उर्मिलावर बेतलेलं नाटक 'उर्मिलायन' हे नाटक लवकरच रंगभूमीवर येतेय. प्रियदर्शन जाधव, रसिका सुनील, अनिकेत विश्वासराव आणि गौतमी देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट असलेले रहस्यमय नाटक 'दोन वाजून बावीस मिनिटांनी' प्रेक्षकांना आवडतेय. रियल कपल उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका असलेले नाटक 'जर तरची गोष्ट' तरुणांना आकर्षित करतेय. मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या, 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' मधील वंदना गुप्ते आणि प्रतीक्षा लोणकर यांची अभिनय जुगलबंदी प्रेक्षकांना भावतेय.
याचबरोबर 'पुरुष', 'ऑल द बेस्ट', 'सही रे सही', 'सूर्याची पिल्ले' अशी पुनरुज्जीवित नाटके व 'अलबत्या गलबत्या' सारखी बालनाट्ये रंगभूमीवर सुरु असून ती प्रेक्षकांना आवडाहेत. मराठी चित्रपट निर्माते 'प्रेक्षक नाही' म्हणून तक्रार करीत असले तरी त्यांच्या तुलनेत मराठी नाटकांना गर्दी होताना दिसतेय. 'टीव्हीवर आल्यावर बघू' असे म्हणणारे अनेक प्रेक्षक आहेत जे सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघत नाहीत. परंतु तशी सोय नाटकांच्या बाबतीत नसल्यामुळे अनेकजण नाट्यगृहात जाऊन नाटके बघतात. निर्मात्यांनी 'फॉर्म्युला ' नाटकं करण्याचे सोडून दिलेलं दिसतं आणि आजच्या काळातील कथानकं नाटकांत दिसल्यामुळे त्यांना प्रेक्षकवर्ग लाभतोय. नाटकामध्ये 'जिवंतपणा' असल्यामुळे आजही ते प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी झालंय.