मुंबई - chandu champion : अभिनेता कार्तिक आर्यन अभिनीत 'चंदू चॅम्पियन' रिलीज होऊन अनेक दिवस उलटून गेले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 'चंदू चॅम्पियन' हा देशातील पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. कार्तिकनं मुरलीकांत पेटकर यांच्या भूमिकेत येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यानं इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या शूटची एक क्लिप शेअर केली आहे. यामध्ये मुरलीकांत पेटकरची भूमिका साकारण्यासाठी त्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हे यात दाखवण्यात आलं आहे.
'चंदू चॅम्पियन'साठी घेतली खूप मेहनत : 'चंदू चॅम्पियन'मध्ये मुरलीकांत पेटकर यांच्या भूमिकेत येण्याआधी, कार्तिकनं पडद्यावर ॲथलीट दिसण्यासाठी अनेक प्रयत्न केले. शेअर केलेल्या क्लिपमध्ये तो थंड पाण्यात पोहायला शिकताना दिसत आहे. कार्तिकला आधी पोहणे येत नव्हते. पण या भूमिकेसाठी तो जलतरणपटू बनला. या चित्रपटासाठी प्रशिक्षण घेत असताना त्याला खांद्यावर दुखापत झाली होती. याशिवाय त्याचे डोळे दुखत होते, अंगात ताप होता, डोकंही दुखत होतं. तरीही त्यानं शूटिंग थांबवलं नाही. कार्तिकनं सतत 9 तास पाण्यात शूट केलं होतं. 'चंदू चॅम्पियन'साठी कार्तिकनं खूप मेहनत घेतली. या चित्रपटासाठी कार्तिकचं समर्पण पाहून निर्माता-दिग्दर्शकही प्रभावित झाले आहेत.
चाहत्यांनी केलं कौतुक : कार्तिकचे प्रशिक्षकही त्याच्या मेहनतीवर खूप खूश आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कार्तिकनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "चंदू चॅम्पियन'साठी त्यानं दोन वर्षे मिठाईला हातही लावला नाही." कठोर प्रशिक्षण, त्याग आणि समर्पण यातून तो चित्रपटातील व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकला. आता यासाठी त्याचे कौतुकही होत आहे. कार्तिक आर्यनचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओच्या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, "कार्तिक, तू खरा चॅम्पियन आहेस." दुसऱ्या एकानं लिहिलं, "चंदू चॅम्पियन'साठी तुमच्यापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही." कार्तिकची मेहनत पाहून इंडस्ट्रीचा पुढचा सुपरस्टार तो असेल असे अनेकजण म्हणत आहेत. 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट कबीर खाननं दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व्यतिरिक्त विजय राज, भुवन अरोरा, यशपाल शर्मा, राजपाल यादव आणि अनिरुद्ध दवे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा :