मुंबई - मिस युनिव्हर्स स्पर्धा ही सर्वात प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धांपैकी एक आहे, त्यामुळे त्याचे नियम आणि कायदेही खूप कडक आहेत. आता अलीकडेच, एका स्पर्धकाला मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेमधून बाहरचा रस्ता दाखवण्यात आला. मिस युनिव्हर्स 2024चा ग्रँड फिनाले 17 नोव्हेंबरला होणार आहे, यापूर्वीच पनामा स्पर्धक स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेल्यानं अनेकजण नाराज आहेत. मिस युनिव्हर्स स्पर्धेत पनामाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेली स्पर्धक इटली मोरानं परवानगी न घेता बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली. यानंतर ती मेक्सिकोमध्ये बॉयफ्रेंड जुआन अबाडियाबरोबर राहिली.
मिस युनिव्हर्स स्पर्धेतून इटली मोरा बाहेर : इटलीनं हे प्रकरण सांभळण्याचा प्रयत्न केला, मात्र इथेच तिचा स्पर्धेच्या संचालकाबरोबर वाद झाला. यानंतर तिला या स्पर्धेतून अपात्र घोषीत करण्यात आलं. आता हे प्रकरणी काही स्पष्ट झाले नसले तरी, फायनलच्या काही दिवस आधी एखाद्या स्पर्धकाला अशाप्रकारे बाहेर काढणे हे धक्कादायक आहे. या प्रकरणावर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं याप्रकरणी लिहिलं की, ' फक्त महिलांसाठीच गोष्टी इतक्या कडक का आहेत, किती क्रीडापटू त्यांच्या जोडीदारांना मैदानात आणतात आणि त्यांच्याबरोबर राहतात, हे नियम फक्त महिलांसाठी का आहेत ? ते कोणाला भेटू शकत नाहीत का?.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला भेटले म्हणून स्पर्धेतून बाहेर काढणे, हा कोणता नियम आहे?' आणखी एकानं लिहिलं, 'फक्त काही दिवस बाकी होते, स्पर्धा संपल्यानंतरही ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटू शकली असती.'
रिया सिंघा भारताचे प्रतिनिधित्व करेल : अशा प्रकारे काही लोक इटलीच्या समर्थनार्थ बोलत आहेत तर काही लोक विरोधात बोलत आहेत. आता याप्रकरणी सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहेत. काहीजण याप्रकरणी वेगळे कारण असल्याचं देखील म्हणताना दिसत आहेत. दरम्यान रिया सिंघाला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज मिळाला होता आणि आता ती जागतिक मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मिस युनिव्हर्स 2024चा ग्रँड फिनाले 17 नोव्हेंबर रोजी मेक्सिकोमध्ये होणार आहे.