लॉस एंजेलिस - भारतासाठी ग्रॅमी पुरस्काराचा दिवस अभिमानाचा ठरला आहे! संगीतकार शंकर महादेवन आणि झाकीर हुसेनच्या फ्यूजन बँड शक्तीने त्यांच्या नव्याने रिलीज झालेल्या 'धिस मोमेंट'साठी सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार जिंकला. त्यांना ग्रॅमी शर्यतीत सुसाना बाका, बोकांटे, बर्ना बॉय आणि डेव्हिडो सारख्या कलाकारांसह नामांकन मिळाले होते. 66 वा वार्षिक ग्रॅमी पुरस्कार 2024 सोहळा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला आहे.
ग्रॅमीजने त्यांच्या X वर एक पोस्ट शेअर करत लिहिलंय, “अभिनंदन सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम विजेते - 'धिस मोमेंट' शक्ती. ग्रॅमीज.” या 'धिस मोमेंट' अल्बममध्ये जॉन मॅकलॉफलिन (गिटार, गिटार सिंथ), झाकीर हुसेन (तबला), शंकर महादेवन (गायनवादक), व्ही सेल्वागणेश (तालवादक), आणि गणेश राजगोपालन (व्हायोलिन वादक) या प्रतिभावान कलाकारांनी तयार केलेली 8 गाणी आहेत.
अनुप जलोटा यांनी केले अभिनंदन - उस्ताद झाकिर हुसेन साहेब आणि आमचे लहान बंधू राकेश चौरासिया यांना ग्रॅमी पुरस्कार मिळालाय याचा आनंद वाटतो. त्यांना भरपूर शुभेच्छा असं म्हणत प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांनी शुभेच्छा दिली आहे.
भारत अतिशय आत्मविश्वासाने जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवत आहे. यापूर्वी 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याने 2023 मध्ये ऑस्कर जिंकला. ऑस्करमध्ये 'ओरिजिनल सॉन्ग' श्रेणीमध्ये नामांकन मिळालेले ते पहिले तेलुगू गाणे होते. रिहाना आणि लेडी गागा सारख्या मोठ्या नावांना मागे टाकत त्यांनी हा पुरस्कार जिंकला. गायक राहुल सिपलीगुंज आणि काळा भैरव आणि संगीतकार एम एम किरवाणी यांच्यासह दिग्दर्शक एसएस राजामौली आणि मुख्य कलाकार ज्युनियर एनटीआर आणि राम चरण देखील या भव्य सोहळ्याला उपस्थित होते.
'नाटू नाटू' गाण्याबद्दल सांगायचे तर, गाण्याची रचना एमएम कीरावानी यांनी केली आहे, गायक राहुल सिपलीगुंज आणि काळा भैरव यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला आहे, प्रेम रक्षित यांनी या गाण्याचे अद्वितीय नृत्यदिग्दर्शन केले होते. 'आरआरआर' चित्रपटातील या गाण्याने जगभर अक्षरशः वेड लावले होते. या गाण्याने 'टेल इट लाइक अ वुमन', टॉप गन: मॅवेरिक, ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर चित्रपटातील लिफ्ट मी अप, आणि धिस इज लाइफ, एव्हरीथिंग, एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स या चित्रपटातील गाण्यांशी स्पर्धा केली होती.
हेही वाचा -
- व्हॅलेंटाईनच्या आधी 'मेरे ख्वाबों में जो आये' गाण्यावर शहनाझ गिलचा कुशा कपिलासोबत डान्स
- संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित समजला जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराचं आयोजन कधी? पंतप्रधान मोदींनाही मिळालयं नामांकन
- प्रेक्षकांच मनोरंजन करताना कॅन्सरशी दिला लढा, सोनाली बेंद्रे ते किरण खेर 'या' सेलिब्रिटींनी दाखविली हिंमत