मुंबई - महाराष्ट्राचा चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी गेली तीन दशके मनोरंजनसृष्टीत वावरत आहे. हिंदी मालिकेमध्ये वयाच्या नवव्या वषापासून सुरु झालेली त्याची वाटचाल अजूनही जोमात सुरु आहे. गेली काही वर्षे स्वप्नील अनवट वाटा शोधताना दिसतोय. तो अभिनयक्षेत्रात निरनिराळे प्रयोग करून बघताना दिसतो. हिंदी, मराठी मनोरंजनसृष्टी गाजवून स्वप्नील जोशीचा मोर्चा आता गुजराती चित्रपटांकडे वळला आहे. मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार स्वप्नील जोशी आता गुजराती चित्रपटात पदार्पण करणार आहे. पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘शुभचिंतक’ या चित्रपटाद्वारे स्वप्नील जोशी पहिल्यांदाच गुजराती प्रेक्षकांना सामोरा जाणार आहे. मराठी प्रेक्षकांना त्याच्या गुजराती चित्रपटातील या नव्या भूमिकेबाबत प्रचंड कौतुक वाटतेय. आता तो अजून एका निराळ्या सिनेसृष्टीत पाऊल ठेवून वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज आहे.
‘शुभचिंतक’ या चित्रपटाच्या कथेविषयी जरी गुप्तता पाळली जात असली तरी चित्रपटात स्वप्नीलची भूमिका अनोखी आणि प्रभावी असेल असे कळतेय. दिग्दर्शक निसर्ग वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट डार्क कॉमेडी थ्रिलर असल्याचं समजतं. या चित्रपटात स्वप्नील जोशीबरोबर मानसी पारेख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मानसी ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री असून ती गुजराती आणि हिंदी प्रेक्षकांसाठी परिचित आहे. चित्रपटाबद्दल बोलताना मानसी म्हणाली की, “स्वप्नीलबरोबर काम करण्याची माझी खूप दिवसांची इच्छा होती. आम्ही आधीच वर्कशॉप आणि लुक टेस्ट पूर्ण केली आहे आणि चित्रपटाची शूटिंग सुरू होण्याची मी उत्सुकतेनं वाट पाहतेय.”
स्वप्नीलनेही या चित्रपटाबद्दल आपलं मत मांडताना सांगितलं की, “गुजराती सिनेमा झपाट्याने विकसित होत आहे आणि त्यातील वैविध्यपूर्ण विषय मला खूप आकर्षित करतात. एका कलाकारासाठी भाषेची बंधनं नसतात आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम कथा महत्त्वाची असते. गुजराती चित्रपटात पदार्पण करण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. मानसीसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरणार आहे.”
‘शुभचिंतक’ हा चित्रपट पार्थिव गोहिल आणि मानसी पारेख यांच्या सोल सूत्र बॅनरखाली तयार होत आहे.