मुंबई - दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेला 'वेट्टियांन' अक्शन ड्रामा हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. 'वेट्टियांन' चित्रपटाच्या ट्रेलरपासून रजनीकांतचे चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा ट्रेलर प्रदर्शित होताच, चित्रपटावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही याची धास्ती निर्मात्यांसह चाहत्यांनाही लागून राहिली होती. त्यावर मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सुनावणी घेतल्यानंतर चित्रपटावर बंदी घालण्यास स्पष्टपणे नकार दिला.
याचिकाकर्त्याची तक्रार काय होती?
याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेमध्ये चित्रपटातील चकमकीच्या प्रसंगादरम्यान बोललेले संवाद काढून टाकण्याची मागणी केली होती. या संवादासह चित्रपट प्रदर्शित करू नये, असे याचिकाकर्त्यानं म्हटलं होतं. हे संवाद काढून टाकल्यानंतरच चित्रपट प्रदर्शित करावा, अशी याचिकाकर्त्याची मागणी होती. या प्रकरणी आज सुनावणी झाली.
न्यायमूर्ती सुब्रमण्यम आणि व्हिक्टोरिया गौरी यांच्या खंडपीठासमोर आज ३ ऑक्टोबर रोजी या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलानं न्यायालयात युक्तिवाद केला की, ट्रेलरमध्ये बोललेले काही संवाद चकमकींना प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्यात यावी. मात्र खंडपीठानं या युक्तिवादानंतर चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिला आणि याप्रकरणी चित्रपट निर्मात्यांना नोटीस पाठवण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले.
'वेट्टियांन' चित्रपटाबद्दल
टीजे ज्ञानवेल यांनी 'वेट्टियांन' चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात रजनीकांत पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रजनीकांतच्या बरोबर या चित्रपटात अमिताभ बच्चन हेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मूंज वॉरियर, दुशारा विजयन, फहद फासिल, राणा दग्गुबती आणि रितिका सिंग यांच्यासह उर्वरित स्टार कास्ट दिसणार आहे. रजनीकांत याआधी अखेरचा 'जेलर' या चित्रपटात दिसला होता. 'जेलर' हा चित्रपट 2023 साली प्रदर्शित झालेला, बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर रजनीकांत यांनी त्यांच्या मुलीनं दिग्दर्शित केलेल्या 'लाल सलाम' या चित्रपटात उत्कृष्ट काम केलं होतं.