मुंबई - All Eyes On Rafah Movement : दक्षिणेकडील गाझा शहर रफाह येथे इस्रायली हल्ल्यात लहान मुलांसह किमान पंचेचाळीस लोक ठार झाले आहेत. पॅलेस्टिनी विस्थापितांच्या निवासस्थानाच्या तंबूला आग लावल्यानं हा प्रसंग उद्भवला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमवारी कबूल केलं की एक 'दुःखद चूक' त्यांच्या बाजूनं झाली आहे. पॅलेस्टाईनवरील नुकत्याच झालेल्या या हल्ल्यामुळं इस्रायल आंतरराष्ट्रीय टीकेचं लक्ष्य बनला आहे. नागरिकांसह लहान मुलांना जीवंत जाळण्याच्या झालेल्या प्रकाराबद्दल अनेक भारतीय सेलेब्रिटींनी संताप व्यक्त केला आहे.
प्रियांका चोप्रा, रश्मिका मंदान्ना, अनुराग कश्यप, इलियाना डिक्रूझ, अथिया शेट्टी, कीर्ती सुरेश आणि इतरांसह भारतीय सेलिब्रिटींनी पॅलेस्टिनी जनतेशी एकता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. युनिसेफची जागतिक सदिच्छा दूत असूनही पॅलेस्टाईनवर आजवर चकार शब्दही न बोललेली प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर "ऑल आइज ऑन रफाह" अशी टेम्पलेट शेअर केली आहे.
प्रियांकाबरोबरच इलियाना डिक्रूझनेही पॅलेस्टिनींना पाठिंबा दर्शवत तिच्या सोशल मीडिया हँडलवर तीन स्टोरी शेअर केल्या आहेत. पहिल्या स्टोरीत तिनं ऑल आइज ऑन रफाह म्हटल्यानंतर दुसऱ्यामध्ये तिनं लिहिलं, "आम्ही सध्या ज्या जगात राहत आहोत त्याची स्थिती पाहून हृदय तुटतं. पुढील व्हिडिओ पाहणे त्रासदायक आहे." तिसऱ्या स्टोरीत तिनं ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या कॅम्पमधील लहान निरागस मुलांचा फोटो शेअर केलाय. ही मुलं हल्ल्यानंतर जीवंत असतील की नाही असं म्हणत तिनं रफाहच्या सुरक्षित पट्टीतील मुलांचं विदारक दृश्य शेअर केलंय.
अभिनेत्री अथिया शेट्टीने पॅलेस्टिनींसाठी उभं राहून इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक स्ट्रिंग शेअर केली आहे. 'ऑल आइज ऑन द रफाह' स्टेटसबरोबरच, तिनं गाझा येथील रफाह येथे बॉम्बहल्ला करण्यापूर्वी पत्रकाराने चित्रित केलेला मुलांचा व्हिडिओ शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर तिनं शांततेवर एक कोट देखील शेअर केला आणि "या ग्रहाला सुधारण्यासाठी आधी आपण सुधारलं पाहिजे"असं शीर्षक दिलं.
प्रियांका इलियाना डिक्रूझ आणि आथिया शेट्टीच्या बरोबरीनंच प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनुराग कश्यप, दक्षिण अभिनेता कीर्ती सुरेशसह अनेकजण सामील झाले. आलिया भट्ट, करीना कपूर, वरुण धवन आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी या हिंसक कृत्याचा निषेध केला आहे.
हेही वाचा -