मुंबई Kumar Shahani passes away : हिंदी चित्रपटसृष्टीत एक दुःखद बातमी समोर येत आहे. दिग्दर्शक कुमार शहानी यांचे निधन झालं आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. वयाच्या ८३ व्या वर्षी कुमार शहानी यांनी हे जग सोडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहानी हे बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. कुमार शहानी यांनी 'माया दर्पण', 'कसबा', 'तरंग' आणि 'ख्याल गाथा' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलंय. दिग्दर्शक असण्यासोबत कुमार यांनी लेखक आणि शिक्षक म्हणूनही आपला ठसा उमटवला. कुमार शहानी यांच्या निधनानं अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर सेलेब्स सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त करत आहेत.
नील माधव पांडानं केला शोक व्यक्त : 'आय ॲम कलाम' सारख्या अनेक चित्रपटांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले निर्माता-दिग्दर्शक नील माधव पांडा यांनी कुमार शहानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिल,'सिनेमॅटिक प्रभुत्वाने जीवनाचा कॅनव्हास रंगवणारे दूरदर्शी चित्रपट निर्माते कुमार शहानी यांचे निधन झाले आहे. सिनेसृष्टीतील एका दिग्गजानं जगाचा निरोप घेतला. तुमची कला सदैव प्रेरणा देत राहील.''
कुमार शहानी यांच्याबद्दल : कुमार साहनी यांचा जन्म 7 डिसेंबर 1940 रोजी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकाना येथे झाला होता. मात्र नंतर ते कुटुंबासह मुंबईत आले. कुमार शहानी यांनी निर्मल वर्मा यांच्य काहाणीवर आधारित 'माया दर्पण' चित्रपट बनवला होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म कॅटेगरीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांनी 'तरंग', 'ख्याल गाथा', 'कसबा' आणि 'चार अध्याय'सह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलं.
3 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले : कुमार शहानी यांनी केवळ राष्ट्रीय पुरस्कारच जिंकले नाहीत तर त्यांनी 3 फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले आहेत. 1973 मध्ये 'माया दर्पण', 1990 मध्ये 'ख्याल गाथा' आणि 1991 मध्ये 'कसबा' या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
हेही वाचा :