मुंबई : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवार सुभाष घई यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. याशिवाय त्यांना अशक्तपणाही जाणवत होता. सध्या त्याच्यावर लीलावती हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, न्यूरोलॉजिस्ट डॉ.विनय चौहान, पल्मोनोलॉजिस्ट डॉ.जलील पारकर आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गोखले यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लवकरच त्यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये नेण्यात येईल.
सुभाष घई यांच्यावर उपचार सुरू : सुभाष घई यांना सुरुवातीला रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना आयसीयूमध्ये ताबडतोब दाखल करण्यात आलं. रिपोर्ट्सनुसार सुभाष घई यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. दरम्यान घई यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांना लहानपणापासूनच अभिनेता होण्याचं होतं, मात्र त्यांनी चित्रपटसृष्टीत चांगला अभिनेता होण्याऐवजी यशस्वी दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध अभिनेता राज कपूर यांच्यानंतर सुभाष घई यांना चित्रपटसृष्टीतील दुसरा 'शो मॅन' म्हटले जाते. सुभाष घई यांनी सुमारे 16 चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलंय.
सुभाष घई यांची हिट चित्रपट : सुभाष घई यांनी चित्रपटसृष्टीत 13 चित्रपट हिट दिले आहेत. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इकबाल' चित्रपटासाठी सुभाष घई यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. सुभाष घई यांनी रोमँटिक, संगीत, देशभक्ती आणि थ्रिलर असे सर्व प्रकारचे चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. यात 'कालीचरण', 'विश्वनाथ', विधाता, 'हीरो', 'मेरी जंग', 'राम लखन', 'कर्ज, 'सौदागर', 'खलनायक', 'ताल', 'यादें', 'परदेस' अशा अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय आता देखील या चित्रपटमधील गाणी खूप लोकप्रिय आहेत. सध्या सुभाष घई हे 'व्हिसलिंग वुड्स' नावाची फिल्म इन्स्टिट्यूट चालवतात. सुभाष घई सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. मात्र अनेकदा ते चित्रपटसृष्टीतील कार्यक्रमांमध्ये झळकतात.