मुंबई - अमिताभ बच्चन यांचा बॅरिटोन आवाज आज त्यांची सर्वात मोठी क्षमता बनली आहे. या आवाजाची जादू संबंध जगावर पसरली आहे. पण याचं आवाजमुळं त्यांना आकाशवाणीनं तर नाकारलं होतंच पण निर्मात्यांनीही त्यांना नाकारलं होतं. 'सात हिंदुस्थानी' या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं होतं पण याच चित्रपटाचे निर्माते असलेल्या मनमोहन साबीर यांनाही बच्चन यांचा आवाज आवडत नव्हता. इतकंच नाही तर सुनिल दत्त यांनीही त्यांच्या "रेश्मा और शेरा" चित्रपटात यांना मुक्या व्यक्तीची भूमिका देऊन बॅरिटोन आवाजापासून स्वतःची सुटका करुन घेतली होती. अमिताभ बच्चन यांच्या आवाजाबद्दलचे अनेक किस्से तुम्हालाही माहिती असतील. अलीकडेच सिद्धार्थ कन्नन यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेत्री शीबा आकाशदीप साबीर या गोष्टीला उजाळा दिला.
अभिनेत्री शीबा ही दिग्दर्शक आकाशदीप साबीरची पत्नी आहे आणि 'सात हिंदुस्थानी' चित्रपटाचे निर्माते मनमोहन साबीर यांची सून आहे. तिनं सिद्धार्थ कन्ननबरोबरच्या मुलाखतीत दिलखुलास चर्चा केली. यामध्ये तिनं बच्चन यांच्या बॅरिटोन आवाजाबद्दलही भाष्य केलं. सिद्धार्थनं तिला विचारलं, "तुझे सासरे सात हिंदुस्थानीचे निर्माते होते. बच्चन साहेबांचा हा पहिला चित्रपट होता त्याबद्दल काही सांगशील का..?"
शीबा म्हणाली, "हो. त्यांनी मला सांगितलं की एक हिरो रोज माझ्या घरी यायचा आणि पायाजवळ बसायचा आणि आम्हाला वाटत होतं की, कशी आवाज आहे याची, विचीत्र, गरजणारी आवाज. खरंतर दत्त साहेबांनीही मला याविषयी सांगितलं होतं. त्यांनीही बच्चन यांना आपल्या चित्रपटात कास्ट केलं होतं. ते म्हणाले की, 'आम्हाला त्याचा आवाज आवडत नव्हता, कसा त्याचा आवाज रेडिओ जॉकीसारखा आवाज होता.' त्यामुळं त्यांनी त्यांच्या चित्रपटात बच्चन यांना मुक्याची भूमिका दिली होती. आपल्याला माहिती आहे की की, बच्चन साहेबांनी मुक्या व्यक्तीची भूमिका दत्त साहेबांच्या चित्रपटात केली होती. त्यांना तो गंभीर बॅरिटोन आवाज आवडत नव्हता, आता हा आवाज आपल्या परिचयाचा आहे, पण तोच आवाज आता त्यांची क्षमता बनलाय."
अमिताभ बच्चन यांना आकाशवाणीकडूनही मिळाला होता नकार -
त्याकाळी मनोरंजन जगतात आकाशवाणीला खूप महत्त्व होतं. 1960 च्या दशकात 'बिनाका गीतमाला'मधील अमीन सयानी यांचा आवाज अफाट लोकप्रिय ठरला होता. त्यामुळे बच्चन यांनाही सुरुवातीच्या दिवसांमध्ये, अमिताभ यांना रेडिओ प्रेजेंटर बनण्याची इच्छा होती आणि त्यांनी आकाशवाणीमध्ये नोकरीसाठी ऑडिशनसाठी अनेक प्रयत्न केले होते. मात्र, त्यांची डाळ काही शिजली नाही. अमिताभ यांनीही आपल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं आहे. नकार मिळाल्याबद्दल त्यांनी कधीही तक्रार केली नाही. आज मात्र अमिताभ बच्चन यांच्या याच आवाजनं इतिहास बदलल्याचं दिसतं. त्यांचा हा आवाज अनेक चित्रपटांचा व्हाईस ओव्हर असतो तर त्यांचा चित्रपट जेव्हा लागतो तेव्हा हाच आवाज ऐकण्यासाठी बच्चन प्रेमी चाहते आवर्जुन गर्दी करतात. आज देशाविदेशातील अबालवृद्धांना ओळखीचा असणारा आवाज हीच बच्चन यांची महत्त्वाची ओळख बनली आहे.