मुंबई ED Attached Shilpa Shetty Property : राज कुंद्रा मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीनं आज अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची 97.79 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. संपत्ती जप्त केल्यानं अभिनेत्री शिल्पा शेट्टीला हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई अंमलबजावणी संचालनालयानं ही संपत्ती जप्त केली आहे. याबाबतची माहिती अंमलबजावणी संचालनालयानं आपल्या एक्स या सोशल माध्यमावरुन दिली आहे.
जुहू आणि पुण्यातील बंगला ईडीनं केला जप्त : अंमलबजावणी संचालनालयानं अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावावर असलेल्या जुहूतील अलिशान सदनिका आणि पुण्यातील बंगला जप्त केला आहे. अंमलबजावणी संचालनालयानं शिल्पा शेट्टीची 97.79 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ही सदनिका आणि बंगला सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावावर आहे, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयानं आपल्या सोशल माध्यमांवरील पोस्टमध्ये शेअर केलीा आहे. त्यासह अंमलबजावणी संचालनालयानं राज कुंद्रा यांच्या नावावर असलेले शेअर्सदेखील जप्त केले आहेत. अंमलबजावणी संचालनालयानं पीएमएलए कायदा 2002 च्या विविध तरतुदीनुसार ही कारवाई केली आहे.
काय आहे राज कुंद्रा मनी लाँड्रींग प्रकरण : महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी मनी लाँड्रींगप्रकरणी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि एजंटच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी नागरिकांकडून तब्बल 6 हजार 600 कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याचा ठापका ठेवला होता. यात दरमहा 10 टक्के परतावा देण्याचं आमिष देण्यात आलं होतं. मात्र प्रवर्तकांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा ठपका अंमलबजावणी संचालनालयानं ठेवला. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला युक्रेनमधून बिटकॉईन मायनिंग फार्म उभारण्यासाठी प्रवर्तक अमित भारद्वाज याच्याकडून 285 बिटकॉईन मिळाल्याचा दावा ईडीनं केला आहे. राज कुंद्रा याच्याकडं 285 बिटकॉईन आहेत. या बिटकॉईन्सची किंमत 150 कोटी रुपये असल्याचा दावाही अंमलबजावणी संचालनालयानं केला आहे.
अजय भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज अद्याप फरार : यापूर्वी या प्रकरणात अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई ईडीकडून राबवण्यात आली होती. 17 डिसेंबर 2023 रोजी सिम्पी भारद्वाज, 29 डिसेंबर 2023 रोजी नितीन गौर आणि 16 जानेवारी 2023 रोजी निखिल महाजन या 3 जणांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य आरोपी अजय भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज अद्याप फरार आहेत. यापूर्वी ईडीनं 69 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :