मुंबई - Chhaava Teaser: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा आगामी चित्रपट 'छावा' हा चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आज 19 ऑगस्ट रोजी निर्मात्यांनी 'छावा'चा टीझर रिलीज केला आहे. विकी कौशलनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टीझर शेअर करताना लिहिलं, " स्वराज्याचे रक्षक. धर्माचे रक्षक. छावा, एका शूर योद्ध्याची महाकथा! आता टीझर आऊट. 6 डिसेंबर 2024 रोजी योद्धा गर्जना करेल." 'छावा' चित्रपटासाठी चाहते खूप आतुर आहेत.
कसा आहे 'छावा'चा टीझर ? : टीझरची सुरुवात युद्धानं होते. यानंतर विकी कौशलची 'छत्रपती संभाजी महाराज' म्हणून एंट्री होते. यात तो शत्रूंबरोबर लढताना दिसतो. विकी कौशलच्या या दमदार अंदाजामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची देदीप्यमान शौर्याची गाथा सांगणारा ऐतिहासिक चित्रपट आहे. यात विकी कौशलबरोबर मुख्य भूमिकेत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'छावा' चित्रपटात विकी कौशल मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रमी ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज, तर रश्मिका ही महाराणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
'छावा' चित्रपटाबद्दल : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य टिकवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवनचरित्र हे शौर्य, संघर्षानं भरलेलं आहे. स्वराज्यरक्षणासाठी निधड्या छातीने मृत्यूला कवटावणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्र हे स्तंभित करणारं आहे. स्वराज्यरक्षणासाठी जगणाऱ्या, लढणाऱ्या आणि प्राणांचं बलिदान करणाऱ्या 'शिवपुत्रा'ची अतिभव्य गाथा रुपेरी पडद्यावर आणण्याचं आव्हान मॅडॉक फिल्म्सनं पेललं आहे. एका रिपोर्टनुसार 'छावा' चित्रपटात मुघल राजपुत्राच्या भूमिकेसाठी अभिनेता नील भूपालमची देखील निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाला ए.आर. रहमान यांनी संगीत दिलं आहे. दरम्यान 'छावा' चित्रपटाचा टीझर पाहून आता विकीचे चाहते सोशल मीडियावर त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "विकी हा अष्टपैलू अभिनेता आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "विकी आणि लक्ष्मण उतेकर छत्रपती संभाजी महाराजांना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणार, यासाठी तुम्हा दोघांचे खूप कौतुक." या पोस्टवर अनेकजण फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.
हेही वाचा :