मुंबई Ayesha Takia Instagram : बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियानं नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले होते. मात्र, अभिनेत्रीच्या चेहऱ्यातील बदल पाहून नेटकऱ्यांनी तिला प्लास्टिक सर्जरी केलीय, असं म्हणत खूप ट्रोल केलं. आयशाला हे सर्व सहन झालं नाही आणि आज (23 ऑगस्ट) तिनं तिचे इंस्टाग्राम अकाउंट डिॲक्टिव्हेट केले. आयशा टाकियानं बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा चित्रपट 'वॉन्टेड' आणि अजय देवगणचा चित्रपट 'टार्झन-द वंडर कार'मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलय.
आयशा टाकियानं अकाउंट केलं डिलीट : आयशा टाकियानं 22 ऑगस्ट रोजी काळ्या जीन्स आणि काळ्या टी-शर्टमध्ये तिचा मिरर सेल्फी व्हिडिओ शेअर केला होता. याआधी आयशानं कांजीवरम साडीतील तिचे काही फोटोही शेअर केले होते. हे फोटो बघून तिच्या चाहत्यांपैकी काहींनी तिचं बार्बी डॉल म्हणून कौतुक केलं. मात्र, इतर नेटिझन्सनी तिला या फोटोजवरुन मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. त्यानंतर या ट्रोलिंगला कंटाळून नाराज अभिनेत्रीनं अखेर आपलं इंस्टाग्राम अकाउंट बंद केलं. आयशाचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स होते.
आयशा टाकियाच्या फोटोंवर नेटिझन्सच्या कमेंट्स : 38 वर्षीय आयशा टाकियाच्या लूकबद्दल एका यूजरनं लिहिलं होतं की, "तुमची प्लास्टिक सर्जरी झाली आहे का?" तर एका चाहत्यानं लिहिलं की, "आम्ही सुरुवातीपासून तुझे चाहते होतो आणि अजूनही आहोत. पण तुझ्या चेहऱ्यानं तुझी काय अवस्था केलीय. प्लास्टिक सर्जरीची काय गरज होती".
आयशाचा वर्कफ्रंट : आयशा शेवटची मॉड (2011) या चित्रपटात दिसली होती. अभिनेत्री आयशा टाकियानं 'टारझन' (2004) या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. एकेळाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आयशा टाकियाचं नाव होतं. वेगवेगळ्या हिंदी चित्रपटांसह दक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनेता सलमान खानसोबत 'वॉन्टेड' (2009) सिनेमात तिनं केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. शिवाय या चित्रपटामुळं तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली होती. त्यानंतर तिनं सपा नेता फरहान आझमीसोबत लग्न केलं.