मुंबई - 5 नोव्हेंबरला बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला रायपूरमधून आपल्या ताब्यात घेतलंय. शाहरुख खानला धमकी देणाऱ्या व्यक्ती विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला होता. ज्या मोबाईल क्रमांकावरून शाहरुख खानला धमकी देण्यात आली होती. तो नंबर रायपूरमधील फैजान खान या वकिलाच्या नावावर नोंदविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई पोलिसांनी शाहरुख खानला धमकी देणाऱ्या फैजान खान या रायपूरमधून ताब्यात घेतलंय. तर दुसरीकडे फैजान खान यालाही धमक्या येत असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय.
मोबाईल चोरीस गेला होता: फिल्म अभिनेता शाहरुख खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर त्या विरोधात वांद्रे पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला असता ज्या क्रमांकावरून शाहरुख खान याला धमकी देण्यात आली होती, तो नंबर छत्तीसगडच्या रायपूरमधील फैजान खान या वकिलाच्या नावावर नोंदविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई पोलिसांची टीम रायपूरला पोहोचली आणि मंगळवारी सकाळी सीएसपी अजय सिंह आणि त्यांच्या टीमने फैजान खान याला त्याच्या रायपूरमधील त्याच्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्या नंबरवरून शाहरुख खानला धमकाविण्यात आले होते, तो नंबर फैजान खान याचाच होता. मात्र शाहरुख खानला धमकी येण्याच्या तीन-चार दिवसांपूर्वी 2 नोव्हेंबरला त्याचा मोबाईल हा चोरीस गेला होता.
फैजान खानलाही येत होत्या धमक्या: फैजान खानच्या कुटुंबीयांचा अशा पद्धतीचा दावा आहे की, फैजान खान हा 14 नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात येऊन आपला जबाब नोंदविणार होता. तशा पद्धतीची विनंती त्याने मुंबई पोलिसांना केली होती. परंतु त्यापूर्वीच पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्याला अटक केली. फैजान खानच्या कुटुंबीयांचा असाही दावा आहे की, फैजान खानचा फोन हरवल्यानंतर त्यालाही जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्याकरता सुरक्षेच्या दृष्टीने त्याने स्वतः मुंबईत येण्याऐवजी ऑडिओ-व्हिडीओच्या माध्यमातून मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याची विनंती त्याने मुंबई पोलीस आयुक्तांना केली होती. परंतु पोलिसांनी आता फैजान खानला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.
कसा झाला घटनाक्रम: डीसीपीच्या म्हणण्यानुसार, वांद्रे पोलीस ठाण्याला एका अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की, मला 50 लाख रुपये द्या, नाहीतर मी बँड स्टँडच्या शाहरुख खानला मारून टाकीन. फोन करणाऱ्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव हिंदुस्थानी सांगितले. यानंतर याबाबत तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर मुंबईतील तीन पोलीस अधिकारी रायपूरला पोहोचले. तिथे एका हॉटेलमध्ये थांबल्यानंतर त्यांनी त्या मोबाईल सिमचे लोकेशन तपासले आणि त्या आधारे ते फैजानच्या घरी गेले. यानंतर त्यांनी फैजानची चौकशी केली. तेव्हा फैजानने त्यांना सांगितले की, त्याचा मोबाईल 2 नोव्हेंबरला हरवला होता. त्याची तक्रारसुद्धा त्याने चार नोव्हेंबर रोजी खामहर्डी पोलीस ठाण्यात नोंदवलीय. तर शाहरुख खानला धमकी देणाऱ्याचा फोन हा 5 नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी रायपूर येथील खामहर्डी पोलीस ठाण्यातील तक्रारीची प्रत तपासली असून, फैजानला ताब्यात घेतलंय आणि पुढील चौकशी सुरू आहे.
हेही वाचा -