मुंबई - ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान आणि सायरा बानू यांनी अलीकडेच विवाहाच्या 29 वर्षानंतर घटस्फोट घेतला. ही बातमी झळल्यानंतर काही तासातच रहमानच्या संगीत टीममधील बासिस्ट मोहिनी डे हिनंही तिचा पती मार्क हार्ट्सपासून विभक्त होण्याची घोषणा केली. यानंतर एआर रहमान आणि मोहिनी डे यांच्या लिंकअपच्या बातम्यांनी सोशल मीडियावर जोर पकडला. आता एआर रहमान यांचा मुलगा एआर आमीन यानं या विषयावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्याच्या वडिलांबद्दल पसरवलेल्या या निराधार बातम्या खोट्या आणि निराधार असल्याचं म्हटलं आहे.
एआर आमीननं त्याचे वडील एआर रहमान यांचा लेजेंड म्हणून उल्लेख करत अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. आमीननं इन्स्टाग्रामवर वडिलांसाठी लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय की, "माझे वडील एक दिग्गज आहेत, ते केवळ एक कलाकार आहेत म्हणून नाही तर त्यांनी निरंतर लोकांमध्ये प्रेम आणि आदर मिळवला आहे, परंतु त्यांच्याबद्दलच्या अशा हास्यास्पद आणि खोट्या बातम्या ऐकून मनाला वेदना होतात. एखाद्याच्या जीवनाबद्दल आणि वारशाबद्दल असं काही बोलताना सर्वजण सत्य आणि आदराचे महत्त्व लक्षात ठेवूयात."
एआर रहमानच्या मुलानं पुढं लिहिलंय की, "कृपया अशा बातम्या पसरवणे टाळा, त्याच्या अस्तित्वाचा आणि स्थानाचा आदर करूया आणि त्यांनी जगावर किती सुंदर प्रभाव टाकला आहे हे लक्षात ठेवूयात."
एआर रहमानच्या पत्नीपासून विभक्त झाल्याच्या बातमीने त्यांचे चाहतेही दु:खी आणि निराश झाले आहे. हे का घडले असावे असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. याआधी एआर रेहमान आणि सायरा बानो यांची मुलगी रहीमा रहमाननेही आई-वडिलांच्या विभक्त होण्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती.
एआर रहमानचं नाव मोहिनी डेशी जोडलं गेल्यानंतर तिलाही याचा त्रास झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. मोहिनीनं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहून अशा अफवांवर एनर्जी खर्च करण्यात काही अर्थ नसल्याचं म्हटलंय. "मला मुलाखतींसाठी खूप मोठ्या प्रमाणात रिक्वेस्ट्स मिळत आहेत आणि त्या नेमक्या कशाबद्दल आहेत हे मला माहीत आहे, मला आदरपूर्वक त्या प्रत्येकाला नकार द्यावा लागेल कारण मला निराधार गोष्टींसाठी इंधन वाया घालण्यात काहीही रस नाही. माझा विश्वास आहे की माझी ऊर्जा अफवांवर खर्च करणे योग्य नाही. कृपया माझ्या गोपनीयतेचा आदर करा.", असं तिनं आपपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.