मुंबई Aishwarya and Abhishek Wedding anniversary : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. या जोडप्यानं 20 एप्रिल 2024 रोजी त्यांच्या लग्नाचा 17 वा वाढदिवस साजरा केला. या जोडप्यानं सोशल मीडियावर मध्यरात्री एक फोटो शेअर करुन एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. फोटोमध्ये ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्याबरोबर दिसत आहे. शेअर केलेला हा फोटो खूप मोहक आहे. या फोटोत ऐश्वर्या आणि अभिषेकनं पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. याशिवाय आराध्यानं लाल आणि पांढऱ्या रंगाच्या रंगसंगतीचा फुलांचा डिझाईन असलेला पोशाख घातला आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेकचा लग्नाचा वाढदिवस : या तिघांचाही परफेक्ट फॅमिली फोटो असल्याचं आता अनेक युजर्स म्हणत आहेत. या जोडप्यानं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये रेड हार्ट इमोजी जोडला आहे. ऐश आणि अभिषेकच्या पोस्टवर आता सगळीकडून लाईक्स आणि कमेंट येऊ लागले आहेत. आता या पोस्टवर बॉलिवूड स्टार्स रितेश देशमुख, सोनू सूद, ईशा देओल, रेमो, डिसूझा, सबा पतौडी यांच्यासह अनेकांनी लाल हार्ट इमोजी शेअर करून कौटुंबिक फोटोवर प्रेम व्यक्त केलं आहे. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, 'तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'. दुसऱ्या चाहत्यानं लिहिल, 'त्यांना एकत्र पाहून खूप आनंद झाला' याशिवाय काहीजण आराध्याचे देखील कौतुक करताना दिसत आहेत.
ऐश्वर्या आणि अभिषेकची प्रेमकहाणी : रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या आणि अभिषेकची भेट 2000 मध्ये 'ढाई अक्षर प्रेम के' दरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांनी 2006 मध्ये 'उमराव जान' या चित्रपटामध्ये काम केलं. यादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. अभिषेकनं त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना सांगितलं होत, 'जेव्हा तो न्यूयॉर्कमध्ये एका चित्रपटाचं शूटिंग करत होता, तेव्हा तो त्याच्या हॉटेलच्या खोलीच्या बाल्कनीत उभा होता आणि विचार करत होता की त्याला ऐश्वर्याला भेटता आले असते तर. यानंतर एका वर्षांनंतर, जेव्हा तो त्याच्या 'गुरु' या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी त्याच हॉटेलमध्ये पोहोचला, तेव्हा त्याला समजले की ऐश्वर्याबरोबर त्याचं जवळच नात आहे. यानंतर त्यानं ऐश समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. या जोडप्यानं 20 एप्रिल 2007 रोजी लग्न केलं. यानंतर ऐश्वर्या 2011मध्ये आई झाली.
हेही वाचा :