मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3'नं यावर्षी लोकांचे खूप मनोरंजन केले आहे. या चित्रपटानंतर कार्तिक आर्यननं आपल्या नवीन प्रोजेक्टबद्दल खुलासा केला आहे. तो करण जोहरच्या नव्या चित्रपटात दिसणार आहे. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, यामध्ये चित्रपटाचे शीर्षक आणि कहाणी समोर आली आहे. कार्तिक आणि चित्रपट निर्माता करण जोहर यांची जोडी अखेर एकत्र आली आहे. कार्तिक आता त्याच्या आगामी चित्रपटासह बॉक्स ऑफिसवर थैमान घालण्यास सज्ज आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा कार्तिकला रोमँटिक कॉमेडी चित्रपटामध्ये परत आणत आहे. कार्तिक आर्यननं त्याच्या इंस्टाग्रामवर नवीन प्रोजेक्टची क्लिप शेअर करून चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
नवीन प्रोजेक्टची क्लिप शेअर : 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' या शीर्षकाचा व्हिडिओ शेअर करताना कार्तिकनं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुझीसाठी येत आहे रुमी. हा मम्मीचा मुलगा नेहमी आपल्या आईची घेतलेली शपथ पाळतो. माझ्या आवडत्या शैलीकडे परत येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' हा चित्रपट 2026 मध्ये थिएटरमध्ये येणारी सर्वात मोठी प्रेमकहाणी आहे.' आता कार्तिकनं शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याचा हा आगामी चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. त्याच्या पोस्टवर त्याचे काही चाहते कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
कार्तिक आर्यनचा आगमी चित्रपट : दरम्यान कार्तिकचा हा चित्रपट 'सत्य प्रेम की कथा'चे दिग्दर्शक समीर विद्वान हे दिग्दर्शित करणार असून धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली त्याची निर्मिती होत आहे. हा चित्रपट 2026 मध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि मुख्य अभिनेत्रीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. 'सत्यप्रेम की कथा'च्या यशानंतर कार्तिकनं पुन्हा नमह पिक्चर्सबरोबर हातमिळवणी केली आहे. धर्मा प्रोडक्शनबरोबरचं त्याचं सहकार्य खूप मोठे असणार असं सध्या दिसत आहे.
हेही वाचा :