मुंबई - Actor Jai Dudhane : मराठी टेलिव्हिजन मालिकाविश्वात आपली आपली एक स्टार सिस्टिम आहे. बऱ्याचदा टेलिव्हिजन स्टार्सची पॉप्युलॅरीटी सिनेमा स्टार्स पेक्षा जास्त असते. तसेच बऱ्याचदा बरेच कलाकार छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळवून मोठ्या पडद्यांची कास धरतात. असाच एक अभिनेता म्हणजे जय दुधाणे. जय दुधाणेने हिंदी रियालिटी शो स्प्लिट्सव्हीला १३ चे विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर त्यानं मराठी बिग बॉसमध्ये आपली छाप सोडली होती. तो 'गडद अंधार', 'वेडात मराठा वीर दौडले सात' सारख्या चित्रपटांतून झळकला आहे. मराठी कलाकार छोटा अथवा मोठ पडदा असा भेदभाव करीत नाहीत. त्याच अनुषंगानं जय दुधाणे आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत अभिनेता जय दुधाणेची एन्ट्री होत असून तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी अनुक्रमे राया आणि मंजिरी या पात्रांच्या भूमिकांत असून जय दुधाणे इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत दिसणार आहे. जय घोरपडे अत्यंत स्वार्थी असून लाच खाल्याशिवाय एकही काम करीत नाही. अडचणीच्या वेळी मदत केल्याचं तो फक्त नाटक करतो परंतु लोकांना खोट्या केसेस मध्ये गोवण्यातही त्याचा हात असतो. तो कामात हुशार असला तरी त्याच्या इतर 'कामा'मुळे पंचक्रोशीत त्याचा दबदबा आहे.
जय दुधाणे आपल्या कारकिर्दीतील पहिली पोलिसी भूमिका साकारणार आहे. या मालिकेविषयी बोलताना तो म्हणाला की, "मला पहिल्यांदाच पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका ऑफर झाली आहे याचा मला आनंद आहे. मला व्यायाम करायला आवडतो आणि मी शरीरयष्ठीवर मेहनत घ्यायला महत्व देतो. त्या गोष्टींचा मला या भूमिकेसाठी फायदा होणार आहे. विशाल निकम माझा आधीपासून मित्र आहे तसेच पूजा बिरारी बरोबरदेखील काम करताना मजा येतेय. माझे काका पोलीस खात्यात आहेत त्यामुळे मी त्यांच्याकडून टिप्स घेतोय जेणेकरून मी माझी भूमिका उत्तमपणे साकारू शकेन. मालिकांची पोच तळागाळापर्यंत असते आणि स्टार प्रवाहसोबतची माझी ही पहिलीच मालिका असल्यामुळे मी प्रेक्षकाच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे."
'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका २७ मे पासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होत आहे.
हेही वाचा -
- मुंबईतील होर्डिंग अपघातात कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, अंत्यसंस्काराला कार्तिकची हजेरी - Mumbai billboard crash
- तरुणाईच्या समस्या मांडणाऱ्या 'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च - Vishay Hard Motion poster
- 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसणार सलग 8 मिनिटांच्या सिंगल टेक वॉर सिक्वेन्सची झलक, ट्रेलरची उलटी गिनती सुरू - Chandu Champion trailer