मुंबई - Aamir Khan Fake Video : सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणूक 2024 जसजशी जवळ येत आहे तसतसे देशातील वातावरण तापत आहे. सोशल मीडियावर वेगानं राजकीय माहिती प्रसारित केली जात आहे. दरम्यान निवडणुकीच्या वातावरणात अभिनेता आमिर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो विशिष्ट राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो ॲक्शनमध्ये आला आहे. हा व्हिडिओ फेक असल्याचं आमिरनं सांगितलं आहे. आमिरनं या फेक व्हिडिओविरोधात मुंबई पोलीस ठाण्यात एफआयआरही दाखल केला आहे.
आमिर खानचा फेक व्हिडिओ व्हायरल : याशिवाय त्यानं अधिकृत निवेदनही जारी केलं आहे. आमिर खानच्या अधिकृत प्रवक्त्यानं निवेदनमध्ये लिहिलं आहे की, 'आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, आमिर खाननं त्याच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत कधीही कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नाही. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाच्या मोहिमेद्वारे मतदानाविषयी जनजागृती वाढविण्याचे त्यानं काम केलं आहे. यानंतर पुढं या निवेदनात लिहिलंय, 'आम्ही अलीकडील व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल चिंतित आहोत, ज्यामध्ये आमिर खान एका खास राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याचा दावा केला जात आहे. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, हा व्हिडिओ फेक आहे. आम्ही या प्रकरणाची माहिती अधिकाऱ्यांना दिली असून मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम सेलमध्ये एफआयआर दाखल केली आहे. आमिर खान सर्व भारतीयांना आवाहन करू इच्छितो की, त्यांनी बाहेर पडून मतदान करावे आणि निवडणूक प्रक्रियेचा सक्रिय भाग व्हावे.'
आमिर खानचं वर्कफ्रंट : आमिर खानच्या आधी देखील साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर , पंतप्रधान मोदी, काजोल देवगण अशा नामांकित व्यक्तींचे फेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं अलीकडेच त्याची माजी पत्नी-चित्रपट निर्माता किरणबरोबर 'लापता लेडीज'ची निर्मिती केली. यात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच तो पुढं 'सितारे जमीन पर' आणि 'लाहोर १९४७' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :