कोल्हापूर Sachin suryawanshi Interview : कोल्हापूर जिल्ह्याला मर्दानी खेळ आणि शिवकालीन युद्धकलेचा वारसा आहे. युगपुरुष छत्रपती शिवरायांनी याच कलेचा वापर करून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं होतं. मात्र कालांतराने ही कला लोप पावत चालली आहे. या कलेचं संवर्धन व्हावं यासाठी कोल्हापूरचे सचिन सूर्यवंशी यांनी 'वारसा' या माहितीपटाची निर्मिती केली.
मोबाईल कॅमेऱ्यावर चित्रित केलेल्या या माहितीपटाला भारतीय चित्रपट सृष्टीतील मानाचा मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. यानंतर दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी हा पुरस्कार मी शिवरायांच्या मावळ्यांना तसेच ही युद्धकला जपलेल्या सर्व खेळाडू आणि तालमींना अर्पण करतो, अशी भावना व्यक्त केली. 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
असा बनला माहितीपट : मर्दानी खेळ म्हणजे शिवकालीन युद्धकला! या युद्धकलेच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. महाराजांचे मावळे मर्दानी खेळात निपुण होते. हा युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी कोल्हापुरातील स्थानिक प्रयत्न करत आहेत, हे या माहितीपटात दाखवण्यात आले आहे. वस्तादांच्या आणि खेळाडूंच्या मुलाखती, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं असं या 25 मिनिटांच्या माहितीपटाचे स्वरुप आहे. कोल्हापूरच्या कला आणि क्रीडाविश्वासाठी ही मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. फुटबॉलवेड्या कोल्हापुरात मर्दानी खेळाचे आखाडे अजूनही तग धरून आहेत. मर्दानी खेळाडू आणि त्यांना घडविणारी वस्ताद मंडळी स्वतःच्या खिशाला झळ लावून हा खेळ जपत आहेत. ते केवळ शिवरायांवरील प्रेमापोटीच करत आहेत. कोल्हापुरातील अनेक पेठांमध्ये अनेक शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक करतानाचे चित्र दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी पाहिलं होतं. यातूनच मर्दानी खेळांचा हा वारसा जपण्यासाठी या कलेवर माहितीपट बनवण्याची संकल्पना त्यांना सुचली. पुढे या संकल्पनेतून 'वारसा' हा माहितीपट आकाराला आल्याचं सूर्यवंशी यांनी सांगितलं.
माहितीपट बनविण्यासाठी 'एवढा' खर्च : या माहितीपटासाठी सलग दोन वर्ष संशोधन आणि चित्रिकरणाचं काम कोल्हापुरात झालं. सचिन सूर्यवंशी हे मागील काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते. पडद्यावर भव्य, दिव्य स्वरूपात दिसणारा माहितीपट तयार करण्यासाठी तब्बल 30 लाख इतका खर्च झाला आहे. हा माहितीपट बनवताना सचिन यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. तरी माघार न घेता स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा माहितीपट पूर्ण केला. त्यांना बॉलिवूडमध्ये सर्वोच्च मानला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार 2019 (सॉकर सिटी) आणि 2022 (वारसा) दोन वेळा मिळाला आहे. छत्रपती शिवरायांपासून चालत आलेली ही युद्धकला शालेय अभ्यासक्रमातही यावी, अशी अपेक्षा या निमित्तानं राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
वारसा साकारण्यासाठी यांची मिळाली साथ : निर्मिती- लेझी लिओ फिल्म्स, सह-निर्माते-सिद्धेश सांगावकर, संदीप बंडा पाटील, प्रसाद पाध्ये, सतीश सूर्यवंशी, चिन्मय जोशी, कविता ननवरे, कुणाल सूर्यवंशी, नरेशन डॉ. शरद भुताडीया, संगीत- अमित पाध्ये, एडिट- प्रशांत भिलवडे, साउंड डिझाईन- मंदार कमलापूरकर, इलस्ट्रेशन्स-विनायक कुरणे, अॅनिमेशन-किरण देशमुख, व्हीएफएक्स- प्रदीपकुमार जाधव, पब्लिसिटी- सचिन गुरव
हेही वाचा: