मुंबई- लोकसभा निवडणुकीत एनडीएचे सरकार पुन्हा येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला. त्यानंतर शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी शेअर खरेदीला पसंती दिली. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २ हजार अंकाहून वाढला. तर निफ्टीचा निर्देशांकही वाढून 23,100 अंकावर पोहोचला आहे. लोकसभा निकालापूर्वी शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजीचे चित्र आहे. मुंबई शेअर बाजार खुला होताच निर्देशांक २६२१ अंकांची उसळी घेऊन 76,583.29 वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक 3.58 टक्क्यांनी वाढून 23,337.90 वर पोहोचला. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच शेअर बाजार नवा विक्रम करेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच शेअर बाजारानं आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक नोंदविला.
- लोकसभा निवडणुकीच्या निकालातील अनिश्चितता आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी (FII) शेअरची केलेली प्रचंड विक्री यामुळे शेअर बाजारात काही दिवस पडझड झाली होती. मात्र, एक्झिट पोलच्या अंदाजनुसार लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला बहुमत येणार असल्यानं शेअर बाजारात सकारात्मक स्थिती आहे.
- बँक निफ्टी 1500 हून अधिक अंकांनी वाढून 50500 च्या वर जाऊन पोहोचला. हा आजपर्यंतचा सर्वोच्च विक्रमी निर्देशांक आहे. मुंबई शेअर बाजार खुला होताच पॉवर ग्रिड कॉर्प, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, श्रीराम फायनान्स आणि एनटीपीसी यांचे शेअर वधारले. भारतीय रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 47 पैशांनी वाढून 82.99 रुपये पोहोचले.
- सेन्सेक्समधील सर्व 30 कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. पॉवर ग्रिड, एनटीपीसी, लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया, अक्सिस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत.
मागील आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 8.2 टक्क्यांनी वाढली. जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेनं स्थान मजबूत केलं आहे.
हेही वाचा-