मुंबई Mukesh Ambani : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अशी ओळख मुकेश अंबानी यांची आहे. त्यांचा मुलगा अनंत अंबानींचा शाही विवाह सोहळा शुक्रवारी मुंबईत पार पडला. या शाही विवाह सोहळ्याची चर्चा जगभरात सुरु आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या लग्नाची चर्चा सुरु आहे. तसंच लग्नात अंबानी कुटुंबीयांकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. ज्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर याठिकाणी शाही विवाह सोहळा संपन्न झाला, त्याच जागेचे मुकेश अंबानींकडून 4381 कोटी रुपये 'एमएमआरडीए'ची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती माहितीच्या अधिकारातून माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवली. त्यात अंबानींव्यतिरिक्त चार बड्या कंपन्यांची थकबाकीसुद्धा येणं बाकी असल्याचीही माहिती समोर आली.
काय आहे प्रकरण? : "माहितीच्या अधिकारातून पाच मोठ्या कंपन्यांनी एमएमआरडीएची कोट्यवधी रुपयांची थकबाकी थकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यात अंबानी फाउंडेशन, रिलायन्स मेसर्स, आयएएनएस, नमन हॉटेल आणि रघुलीला बिल्डर्स अशा एकूण पाच थकबाकीदारांनी एमएमआरडीएची थकबाकी थकवली आहे. एमएमआरडीएची जमीन लिजवर घेतली तर ती जमीन कशासाठी घेतली? तसंच त्याचं बांधकाम चार वर्षाच्या आत न केल्यास दंडात्मक कारवाई होते. आता कंपनींनी चार वर्षाच्या आत बांधकाम न केल्यामुळं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणं अपेक्षित होती. कारण एमएमआरडीएचा नियमानुसार जर तुम्ही चार वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण नाही केलं तर दंड भरावा लागतो. या दंडाची थकबाकी वरील कंपन्याची आहे. मात्र या कंपन्यावर एमएमआरडीएकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही," असं माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र : तसंच या पाचही कंपन्याची मिळून एकूण थकबाकी 5818 कोटी आहे. 2017 रोजी यांना एमएमआरडीएकडून थकबाकीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. जरी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असले तरी यांना ओसी देऊ नये, अशी आमची मागणी आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही अनिल गलगली यांनी म्हटलं आहे.
कोणाची किती थकबाकी ?
- नमन हॉटेल लिमिटेड 48.92 कोटी
- आयएनएस 181.35 कोटी
- अंबानी फाउंडेशन 8.15 कोटी
- मेसर्स रिलायंस 4381.32 कोटी
- मेसर्स रघुलीला बिल्डर्स 1123.50 कोटी
हेही वाचा :