मुंबई - Earth Day 2024 : आज 22 एप्रिल रोजी 'जागतिक वसुंधरा दिन' साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना पर्यावरणाला असलेल्या धोक्यांची जाणीव करून देणं आणि लोकांना पर्यावरण रक्षणासाठी प्रोत्साहित करणं हा आहे. पृथ्वीच्या ढासळत्या पर्यावरणाविषयी आता जागृत होणं गरजेचं आहे. कारण दिवसेंदिवस पृथ्वीचं तापमान वाढत आहे, त्यामुळे सर्व सजीवांना यापासून धोका होत आहे. भूस्खलन, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचं प्रचंड नुकसान होताना आपण रोज पाहतो. पृथ्वीवरील पर्यावरण चांगलं राहण्यासाठी कठोर उपाय केले पाहिजेत.
पर्यावरणाचं करा रक्षण : जर एखाद्या व्यक्तीनं आपल्या स्तरावर पर्यावरण रक्षणाचा प्रचार केला आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली, तर आपली पृथ्वी सतत बहरत राहील. यंदा 54 वा 'वसुंधरा दिन' साजरा केला जात आहे. पहिल्यांदाच या दिवसाचे आयोजन यूएस सिनेटर आणि पर्यावरणवादी गेलॉर्ड नेल्सन आणि हार्वर्ड विद्यापीठाचे पदवीधर विद्यार्थी डेनिस हेस यांनी केलं होतं. 22 एप्रिल 1970 रोजी, अंदाजे 20 दशलक्ष अमेरिकन लोकांनी रस्त्यावर उतरून जलप्रदूषण, तेल गळती, जंगलातील आग आणि वायू प्रदूषण यासारख्या संकटांविरुद्ध निदर्शने केली होती. यानंतर या निदर्शनाला जागतिक स्वरूप प्राप्त झालं. ही एक जागतिक चळवळ बनली. यानंतर पृथ्वीवरील पर्यावरण सुरक्षित राहण्यासाठी मोठी पावलं उचलली जाऊ लागली.
प्लास्टिक वापरणे टाळा : यावेळी 'वसुंधरा दिना'ची थीम प्लेनेट वर्सेस प्लास्टिक आहे. या वर्षीच्या थीमचा उद्देश लोकांना प्लास्टिक प्रदूषण थांबविणं आणि त्याचा वापर कमी करणं हा आहे. या थीमद्वारे 2040 पर्यंत प्लास्टिकचा वापर 60 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्लास्टिकमुळे पृथ्वीवर खूप प्रदूषण होत आहे. अनेक जलाशयमध्ये प्लास्टिक पडलेलं दिसतात, त्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. जलाशयामधील जीव प्लास्टिक खाऊन मरत आहेत. ही एक मोठी समस्या आहे. याशिवाय अनेकदा आपल्याला कोणी प्लास्टिक जाळताना दिसतात, त्यामुळे वायू प्रदूषण होते. आता याबाबत मोठे ठोस पाऊल उचलणं गरजचे आहे. आज जागतिक तापमानात होणारी वाढ, वातावरणातील बदल, प्रदूषण अशा अनेक मोठ्या समस्या आपल्यासमोर आहेत. जर पृथ्वीवर असं प्रदूषण वाढत गेलं तर एक दिवस असा उजाडेल की इथले सर्व प्राणी संपून जातील.
पर्यावरण रक्षण
1 खूप झाडं लावली पाहिजे.
2 मधमाशी पालन करण्यावर भर दिला पाहिजे.
3 प्लास्टिकचा वापर टाळावा.
4 वायू प्रदूषण कमी करण्यासाठी कारखान्यावर निर्बंध आणायला पाहिजेत.
5 जलाशये स्वच्छ ठेवली पाहिजेत.
हेही वाचा :
- महावीर जयंती 2024 : भगवान महाविरांच्या प्रेरणादायी विचारांबाबत जाणून घ्या 'या' खास गोष्टी - mahavir jayanti 2024
- 'विद्येविना मती' जाऊ न देण्याचं भान देणाऱ्या महात्मा फुले यांची आज जयंती, पंतप्रधान मोदींसह विविध नेत्यांनी केलं अभिवादन - Mahatma phule jayanti 2024
- अपराजिता फुलाचे आयुर्वेदात विषेश महत्त्व, जाणून घ्या फायदे - Aprajita flower