चंदीगड- पंजाब लोकसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना निवडणूक चुरशीची होत आहे. अशातच अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावित आहेत. बेअंत सिंह आणि सतवंत सिंह हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अंगरक्षक होते. त्यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या केली होती. बेअंत सिंह यांचे पुत्र सरबजीत सिंह हे फरिदकोट येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहेत.
सरबजीत सिंह यांनाी यापूर्वी २००४ मध्ये बठिंडामधून लोकसभा निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांना १ लाख १३ हजारांहून अधिक मते मिळाली होती. २००७ मध्ये भदूर विधानसभा निवडणूक लढविली होती. तेव्हा १५ हजारांहून अधिक मते मिळाली होती. २०१४ मधील लोकसभा निवडणूक लढविताना फतेगड साहिबमधून सरबजीत सिंह यांचा पराभव झाला होता त्यांना निवडणुकीत आजवर यश मिळाले नाही. मात्र, त्यांची आई आणि आजोबा यांना यश मिळालं होतं. १९८९ मध्ये सरबजीत सिंह यांच्या आई विमल कौर यांनी रोपडमधून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांनी ४ लाखांहून अधिक मते मिळवून खासदार होत रोपड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलं होतं. बेअंत सिंह यांचे आजोबादेखील खासदार होते. त्यांनी 1989 मध्ये 3 लाखांहून अधिक मते मिळवून बठिंडाची लोकसभा निवडणूक जिंकली होती.
लोकांचा आग्रह म्हणून...बहुतांश राजकीय पक्षांकडून फरीदकोट मतदारसंघातून अधिकतर कलाकारांना उमेदवारी दिली जाते. अद्याप अकाली दल आणि काँग्रेसनं फरीदकोटमधून लोकसभेचा उमेदवार जाहीर केला नाही. मात्र, इंदिरा गांधीच्या हत्या करणाऱ्या मारकेऱ्याच्या मुलानं लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं येथील राजकीय समीकरण बदलणार आहेत. ४५ वर्षीय सरबजीत सिंह म्हणाले, "फरीदकोटमधील अनेक लोकांनी निवडणूक लढविण्याकरिता आग्रह केला. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे."
फरीदकोट येथे कोणते उमेदवार लोकसभेच्या रिंगणात?फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार हे करमजीत अनमोल निवडणूक लढवित आहेत. तर भाजपाचे उमेदवार गायक हंसराज हंस यांचं तगडं आव्हान आपच्या उमेदवाराला असणार आहे. पंजाबी लोकगायक मोहम्मद सादिक यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवून विजयी झाले होते. हे विद्यमान खासदार पुन्हा काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये १३ लोकसभा जागांसाठी १ जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. फरिदकोटच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल इतर मतदारसंघाप्रमाणंच ४ जूनला लागणार आहे.
हेही वाचा-