नवी दिल्ली Electoral Bond Data : निवडणूक रोखे प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं एसबीआयनं माहिती सादर केली. एसबीआयनं सादर केलेली ही माहिती निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे. यात 'लॉटरी किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सँटियागो मार्टिन यांनी सर्वाधिक देणगी दिल्याचं पुढं आलेलं आहे. त्यांनी सुरू केलेल्या फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं सर्वाधिक देणग्या राजकीय पक्षांना दिल्याचं स्पष्ट झालं.
एसबीआयनं दिला निवडणूक रोख्यांचा तपशील : सर्वोच्च न्यायालयानं स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोखे प्रकरणात मुदत वाढवून देण्यास नकार दिला. त्यानंतर एसबीआयनं निवडणूक रोखे प्रकरणाचा तपशील निवडणूक आयोगाकडं गुरुवारी जाहीर केला. यानंतर कोणत्या संस्थांनी कोणत्या राजकीय पक्षांना सर्वाधिक देणग्या दिल्या याबाबतची माहिती उघड झाली. यात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
'लॉटरी किंग'नं दिल्या सर्वाधिक देणग्या : निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक रोखे यादीत 'लॉटरी किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सँटियागो मार्टिनचं नाव पुढं आलं आहे. फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या त्यांच्या फर्मनं राजकीय पक्षांना सर्वाधिक देणग्या दिल्या. 'लॉटरी किंग' असलेल्या सँटियागो मार्टिन यांनी सर्वाधिक देणग्या दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपाला सँटियागो मार्टिन यांनी दिल्या 83 टक्के देणग्या : देणगी प्रकरणात सँटियागो मार्टिन यांचं नाव येण्याची ही पहिली वेळ नाही. तामिळनाडूचे माजी काँग्रेस प्रमुख अलागिरी यांनी सँटियागो मार्टिन यांच्यावर 2021 मध्ये आरोप केले होते. विधानसभा निवडणुकीत सँटियागो मार्टिन यांनी भाजपाला 83 देणग्या दिल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. विविध राजकीय पक्षांना 245.7 कोटी रुपयांनी त्यांनी देणगी दिली आहे.
भाजपाला तब्बल 90 टक्के देणग्या : निवडणूक रोखे प्रकरणात विविध आरोप झाल्यानंतर मोठा राजकीय वाद सुरू झाला. त्यानंतर या प्रकरणातील तपशील उघड झाला आहे. निवडणूक वॉचडॉग असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार 2022-23 मध्ये पाच राष्ट्रीय पक्षांना 680.49 कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट देणग्या देण्यात आल्या आहेत. यातील तब्बल 90 टक्के देणग्या एकट्या भाजपाला देण्यात आल्या आहेत. फ्यूचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेनं 2019 आणि 2024 दरम्यान तब्बल 1368 कोटी देणगी दिली आहे. अंमलबजावणी संचालनालय 2019 पासून पीएमएलए कायद्याच्या विविध कलमानुसार कंपनीची चौकशी करत आहे. या कंपनीवर मे 2023 मध्ये कोईम्बतूर आणि चेन्नई इथं ईडीनं छापेही टाकले होते.
कोण आहेत सँटियागो मार्टिन : सँटियागो मार्टिन यांनी आपल्या वेबसाईटवर सविस्तर माहिती दिली आहे. त्या माहितीनुसार सँटियागो मार्टिन यांनी म्यानमारच्या यांगूनमध्ये मजूर म्हणून आपल्या करियरची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी भारतात परत येऊन 1988 ला तामिळनाडूमध्ये लॉटरी व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय कर्नाटक आणि केरळमध्ये पसरवला. इथं त्यांनी सरकारी लॉटरी योजनाही हाताळली. त्यानंतर भूतान आणि नेपाळमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. त्यानंतर त्यांनी बांधकाम, रिअल इस्टेट, कापड आणि हॉटेल या क्षेत्रात गुंतवणूक केली. सध्या सँटियागो मार्टिन हे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ लॉटरी ट्रेड अँड अलाईड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष देखील आहेत. भारतात ते चॅरिटेबल संस्था चालवत असल्याचंही त्यांच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचा :