नवी दिल्ली IIT Student Commits Suicide : आयआयटी दिल्लीच्या द्रोणगिरी वसतिगृहात एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. वरद संजय नेरकर (वय 23) असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो नाशिकचा रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
गुरुवारी रात्री घडली घटना : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरद नेरकर हा एमटेकच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याने राहत्या खोलीत आत्महत्या केल्याची बाब गुरुवारी (15 फेब्रुवारी) रात्री उघडकीस आली. तसंच विद्यार्थ्याचे कुटुंबीय दिल्लीत आल्यानंतरच मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाईल. तपासादरम्यान असं समोर आलं की, कुटुंबीयांचा विद्यार्थ्याशी संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा त्यांनी वसतिगृहाच्या गार्डला याची माहिती दिली. त्यानंतर गार्ड त्याच्या खोलीत पोहोचला. तेव्हा ही बाब उघडकीस आली. त्यानंतर तात्काळ या घटनेसंदर्भात पोलिसांना कळविण्यात आलं.
फॉरेन्सिक आणि एसएचओ टीम घटनास्थळी दाखल : दक्षिण पश्चिम जिल्ह्याचे डीसीपी रोहित मीणा यांनी सांगितलं की, "गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास पीसीआर कॉलद्वारे त्यांना आयआयटी दिल्लीतील एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच फॉरेन्सिक आणि एसएचओ टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली." ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता. अग्निशमन विभागाने दरवाजा तोडला. यावेळी तिथं क्राईम टीम आणि फॉरेन्सिक टीमही हजर होती. मात्र, दोन्ही टीमला तिथं आक्षेपार्ह वस्तू अथवा कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. तसंच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचंही यावेळी रोहित मीणा यांनी सांगितलं.
हेही वाचा -