हल्द्वानी (उत्तराखंड) Haldwani Violence : उत्तराखंडमधील हल्द्वानीत प्रशासनानं अतिक्रमणाविरोधात कारवाई केल्यानंतर दंगल उसळली होती. कालपासून असलेलं तणावाचं वातावरण थोडं कमी झालं असलं तरी अद्याप संचारबंदी शिथिल करण्यात आलेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हल्द्वानी येथे पोहोचून जखमींची प्रकृती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसह हिंसाचारग्रस्त भागांना भेट दिली आणि ताज्या परिस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
NSA लावण्याचा इशारा : हल्द्वानीच्या बनभूलपुरा भागात परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. पोलिसांची शहरात सतत गस्त सुरू असून संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी 5 हजार अज्ञातांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बऱ्याच जणांना ताब्यात घेण्यात आलंय. डीजीपी अभिनव कुमार यांनी, हिंसाचार करणाऱ्यांवर NSA (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) लावण्याबद्दल बोलताना, भविष्यात अशा घटना घडवण्यापूर्वी पुन्हा विचार करण्याचा इशारा दिला.
प्रशासनाच्या टीमवर दगडफेक : प्रशासनानं हल्द्वानी येथील बनभूलपुरा भागातल्या महापालिकेच्या जागेवरील बेकायदेशीरपणे मशीद आणि मदरश्यावर गुरुवारी कारवाई केली. महानगरपालिकेनं मदरसा आणि मशिदीच्या चालकांना नोटीस बजावून जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र ते न हटल्यानं गुरुवारी प्रशासनाचं पथक मोठा पोलिस बंदोबस्त आणि जेसीबी मशिनसह घटनास्थळी पोहोचलं. याला स्थानिक लोकांनी विरोध करत, या टीमवर दगडफेक केली. या घटनेत अनेक पोलीस, जिल्हा प्रशासनातील लोक आणि मीडिया कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर आणखी गोंधळ वाढला.
मृतांची संख्या 5 वर : हल्द्वानी येथे गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी उसळलेल्या हिंसाचारात मृतांची संख्या 5 झाली आहे. तसेच 3 जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींवर सुशील तिवारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हिंसाचारात 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
हे वाचलंत का :