दिंडीगुल (तामिळनाडू) Tirupati Laddu Controversy : तिरुपती मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये भेसळ केल्याचा आरोप झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय. तमिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील एआर डेअरी फूड्स ही कंपनी तिरुपती मंदिराला तूप पुरवण्याचे कंत्राट मिळालेल्या कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या जून आणि जुलै या दोन महिन्यांसाठी या कंपनीकडून तिरुपती मंदिराला तुपाचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळं आता या कंपनीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
68 हजार किलो तुपाची डिलिव्हरी : एआर डेअरी कंपनीला मंदिराकडून 8.50 लाख किलो तुपाची ऑर्डर मिळाली होती. मात्र, कंपनीनं दोन महिन्यांत 68 हजार किलो तुपाची डिलिव्हरी केली. तिरुमला तिरुपती देवस्थानमने (TTD) तुपाचा दर्जा चांगला नसल्याचं सांगत यावर्षी 22 जुलै रोजी कंपनीशी करार रद्द केला. मंदिर प्रशासनानंही कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं होतं. मंदिराच्या प्रशासकीय अधिकारी श्यामला राव यांनीही त्यावेळी यासंदर्भात घोषणा केली होती.
एआर डेअरीकडून स्पष्टीकरण : तिरुपती लाडूमध्ये भेसळीचा आरोप झाल्यानंतर एआर डेअरी कंपनीनंही स्पष्टीकरण दिलंय. 20 सप्टेंबर रोजी डेअरी कंपनीच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या उत्पादनांमध्ये कोणतीही भेसळ नसल्याचं सांगितलं होतं. तसंच तूप उत्पादनं पाठवण्यापूर्वी टीटीडीनं त्यांची चाचणी केली असल्याचा पुरावा त्यांच्याकडं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
एआर डेअरीतील तूप आणि इतर उत्पादनांचे घेतले नमुने : तामिळनाडू सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता अनिता यांनी चाचणीसाठी कंपनीच्या सांडपाण्याचे नमुने घेतले आहेत. तर 20 सप्टेंबर रोजी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या अधिकाऱ्यांनी एआर डेअरीची 2 तासांपेक्षा जास्त वेळ तपासणी केली. त्यांनी दूध, तूप, चीज, लोणी, दही, ताक, मिठाई आदींचे नमुने तपासणीसाठी घेतले.
पलानी मुरुगन मंदिराला तूप पुरवठ्यावर प्रश्न : भाजपाचे प्रदेश सचिव विनोज पी सेल्वम आणि भाजपाच्या व्यवसाय युनिटचे उपाध्यक्ष सेल्वाकुमार यांनी एक्सवर पोस्ट करत असा दावा केलाय की, दिंडीगुलस्थित एआर डेअरी कंपनी पलानी मुरुगन मंदिराला तूप पुरवत असून कंपनीचे प्रमुख राजशेकरन हे पलानी मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. ज्यामुळं संशय निर्माण होतो. तामिळनाडू सरकारनं त्यांना हटवावं आणि कंपनीकडून तूप खरेदी बंद करण्यासाठी पावलं उचलावीत, असं ते म्हणाले.
पलानी मंदिराच्या प्रसादात अवीन कंपनीचं तूप वापरलं जातं असल्याचं तामिळनाडू सरकारनं म्हटलंय. तसंच पलानी मंदिर विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ गेल्या महिन्यात संपला होता. राजशेखरन पलानी हे अध्यक्ष नसून मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान, या प्रकरणी पलानी मंदिर प्रशासनानं भाजपा नेते विनोज पी सेल्वम आणि सेल्वकुमार यांच्या विरोधात पलानी आदिवरम पोलीस ठाण्यात चुकीची माहिती पसरवल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा -