बंगळुरू Bagalkot Accident : माती वाहणारा टिप्पर रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या नागरिकांवर उलटून एकाच कुटुंबातील 5 नागरिकांचा मृत्यू झाला. ही घटना बागलकोटमधील बिलागी तालुक्यातील यत्नती क्रॉसजवळ रविवारी रात्री घडली. यंकप्पा शिवाप्पा तोलामट्टी (72), येल्लावा यंकाप्पा तोलामट्टी (66), पुंडलिक यंकप्पा तोलामट्टी (40), नागव्वा अशोक बम्मन्नवरा आणि अशोक नागप्पा बम्मन्नवरा ( 40 ) अशी मृत नागरिकांची नावं आहेत.
शेतात काम करुन घरी परत जात होते नागरिक : यत्नती इथल्या एकाच कुटुंबातील पाच नागरिकांचा टिप्परखाली दबून मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे पाच नागरिक शेतात काम करुन बदरदिनी या गावी परत जात होते. ते यत्नत्ती क्रॉसजवळ रस्त्याच्या कडेला उभे होते. यावेळी त्यांच्यावर काळानं घाला घातल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
टायर फुटल्यानं टिप्पर उलटला : पाच नागरिकांचा बळी घेणारा टिप्पर हा माती वाहणारा असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. हा टिप्पर भरधाव वेगानं जात होता. यावेळी यत्नत्ती क्रॉसजवळ या भरधाव टिप्परचा टायर फुटल्यानं तो रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या नागरिकांवर उलटला. याच एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहन चालकानं काढला पळ : भरधाव टिप्परनं पाच नागरिकांचा बळी घेतल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पोहोचली. त्यामुळे बदरदिनी इथल्या हजारो नागरिकांनी घटनास्थळाकडं धाव घेतली. मात्र अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेतली. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा आढावा घेतला. "पोलिसांनी टिप्परखाली दबलेल्या मृतदेहांना बाहेर काढलं आहे. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी तालुका रुग्णालयात पाठवले आहेत. या अपघात प्रकरणी बैरागी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई यांनी दिली आहे.
हेही वाचा :