हैदराबाद Palnadu Road Accident : टिप्पर आणि खासगी बसच्या झालेल्या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री पलनाडू इथं घडली. ही खासगी बस बापटला जिल्ह्यातील चिनागंजम इथून चिलाकालुरीपेट मार्गे हैदराबादला येत होती. मात्र भरधाव टिप्पर आणि बसची समोरासमोर धडक झाल्यानंतर बसनं पेट घेतला. यानंतर बसमधील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये काशिब्रमेश्वर राव (62), लक्ष्मी (58) आणि श्रीसाई (9) आदींचा समावेश आहे. मृत नागरिक बापटला जिल्ह्यातील निलयापलेम येथील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मतदान करुन परतणाऱ्या प्रवाशांवर काळाचा घाला : चिनागंजम इथं मतदानासाठी गेलेले नागरिक मतदान करुन मंगळवारी रात्री खासगी प्रवाशी बसनं हैदराबादला परत येत होते. खासगी प्रवासी बस चिनागंजम इथून हैदराबादला येत होती. यावेळी पलनाडू इथं मंगळवारी रात्री भरधाव वेगानं येणाऱ्या टिप्पर आणि खासगी प्रवासी बसची धडक झाली. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. मतदान करुन परतणाऱ्या प्रवाशांवर काळानं घाला घातल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अपघातानंतर टिप्पर आणि बसनं घेतला पेट : चिनागंजम इथून हैदराबादला येणारी खासगी बस पलनाडू परिसरातील पासुमारू या गावाजवळून भरधाव जात होती. यावेळी खडी भरुन येणारा टिप्पर आणि बसची जोरदार धडक झाली. या धडकेत टिप्परनं पेट घेतल्यानंतर थोड्याच वेळात खासगी बसनंही पेट घेतला. त्यामुळे बसमधील पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी होता. या जखमीला रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या वाढून सहा झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आगीत होरपळल्यानं 20 जण गंभीर जखमी : हैदराबादला येणाऱ्या खासगी बसमध्ये 40 प्रवाशी होते. मात्र बसनं पेट घेतल्यानं प्रवाशांना बाहेर पडण्यास अडथळे निर्माण झाले. त्यातही प्रवासी झोपेत असल्यानं आग लागल्याची घटना समजण्यास वेळ लागला. त्यामुळे या घटनेत 20 जण होरपळून जखमी झाले. मात्र अपघात झाल्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ 108 ला याबाबतची माहिती दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी आणि 108 रुग्णवाहिकेंनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा :
- टायर फुटल्यानंतर डिव्हायडर तोडून ट्रकला धडकली कार; भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू - Hapur Road Accident
- एसटी बस आणि कारची भीषण धडक: अपघातात तीन जणांचा मृत्यू, दोन वर्षीय बालक गंभीर - Nashik Road Accident
- पेट्रोल पंप असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा, आणखी काहीजण होर्डिंगखाली अडकल्याची भीती - Ghatkopar Hording Collapsed