उत्तराखंड/हिमाचल प्रदेश Cloudbursts in Uttarakhand Himachal : राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. केदारनाथ मार्गावर दरड कोसळ्यानं अनेक भाविक मध्येच अडकले आहेत. 'एसडीआरएफ' आणि 'एनडीआरएफ' या यात्रेकरूंची सुरक्षित सुटका करत आहेत. जंगलातून यात्रेकरूंची दोरीच्या साहाय्याने सुटका केली जात आहे. यासोबतच ढगफुटीमुळं बाधित लिंचोली येथील भाविकांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात येत आहे.
जंगलचट्टीत ढगफुटी : बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळं केदार खोऱ्यातील लिंचोलीजवळील जंगलचट्टी येथे ढगफुटी झाली. त्यामुळं रामबाडा, भिंबळी, लिंचोलीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. घटनास्थळी अडकलेल्या यात्रेकरू आणि मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जिल्हाधिकारी सौरभ गहरवार यांनी गुरुवारी स्वतः घटनास्थळी पोहोचून बाधित भागाचा आढावा घेतला.
मंदाकिनी नदीवरील पूल गेले वाहून : रामबाडा येथे दोन पूल वाहून गेले : केदारनाथ पायी मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. रामबाडा ते लिंचोली दरम्यानच्या पदपथाची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. केदारनाथ पायी मार्गावरील रामबाडा येथील मंदाकिनी नदीवर असलेले दोन पूल वाहून गेले आहेत. हे पूल जुन्या मार्गावर होते. प्रवासी आणि घोडेस्वार या पुलांचा शॉर्टकट मार्ग म्हणून वापर करतात. बुधवारी रात्रीच्या पावसात मंदाकिनी नदीच्या जोरदार प्रवाहाने हे पूल वाहून गेले.
हिमाचलमध्ये ढगफुटी : शिमला जिल्ह्यातील रामपूरमध्ये गुरुवारी सकाळी ढगफुटी झाली. झाकरीच्या समेळ खोऱयामध्ये ढगफुटीमुळे ३६ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली आहे. ढगफुटीमुळे परिसरात सर्वत्र विध्वंसाचे दृश्य दिसत आहे. 'एसडीएम' रामपूर निशांत तोमर यांनी सांगितले की, "आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ढगफुटीमुळे बाधित भागातून 36 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर या विध्वंसामुळे अनेक ठिकाणी रस्तेही तुटून ते बंद पडले आहेत. त्यामुळे बचाव पथक दोन किलोमीटर चालत उपकरणांसह घटनास्थळी पोहोचले. बचाव पथकाने मदतकार्य सुरू केले आहे."