बांगलादेश Bangladesh violence update: बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील कोटा पद्धतीविरोधात आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी (रविवारी) बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आलाय. देशभरात प्रचंड हिंसाचार आणि जाळपोळ झाली. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलक आणि सत्ताधाऱ्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. यात 14 पोलिसासह 90 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत.
आतापर्यंत 91 जणांचा मृत्यू: स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशभरात झालेल्या हिंसक संघर्षात आतापर्यंत 91 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 14 पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी 13 जणांचा सिराजगंजच्या इनायतपूर पोलीस ठाण्यात मृत्यू झाला. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी गृह मंत्रालयानं रविवारी सायंकाळी 6 वाजता संचारबंदी लागू केली. तसंच इंटरनेट सेवेबरोबरच सरकारनं फेसबुक, मेसेंजर, व्हाट्सअप आणि इन्स्टाग्राम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं काय घडलं?: आंदोलकांनी रविवारी सकाळी सरकारच्या राजीनाम्याची मागणी करत अहसहकार आंदोलनाची घोषणा केली. यादरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला, त्यानंतर दोन्ही गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली.
पंतप्रधान हसीना यांची प्रतिक्रिया: हिंसक आंदोलकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पंतप्रधान हसीना यांनी दिल्या आहेत. "जे निषेधाच्या नावाखाली देशभरात तोडफोड करत आहेत ते विद्यार्थी नसून दहशतवादी आहेत'' असं वक्तव्य त्यांनी केलं.
देशात तीन दिवसांच्या सुट्टीची घोषणा : सर्वसामान्य नागरिकांच्या बांगलादेश सरकारने सुरक्षिततेसाठी सोमवार, मंगळवार आणि बुधवार अशी तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.
अवामी लीगच्या सहा नेत्यांना बेदम मारहाण : स्थानिक वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार फेनीमध्ये पाच जण ठार झाले. सिराजगंज इथं 13 पोलिसासह 22, किशोरजंगमध्ये 4, मुन्शीगंज इथं 3, मगुरामध्ये 4, भोलामध्ये 3, रंगपूरमध्ये 4, पबनामध्ये 3, सिल्हेतमध्ये 4, कुमिल्लामध्ये 3, जॉयपुरहाटमध्ये 1, हबीगंजमध्ये 1 आणि बारिसालमध्ये 1 जणांचा मृत्यू झालाय. नरसिंगडी येथे सत्ताधारी पक्षाचे समर्थक आणि आंदोलक यांच्यात झालेल्या संघर्षात अवामी लीगच्या सहा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
हेही वाचा