छपरा Seven Sisters In Bihar Police : आज महिला सक्षमीकरणासाठी देशासमोर अनेक आवाहनं आहेत. मात्र, अशातही बिहारच्या छपरा जिल्ह्यातील सात बहिणींची गोष्ट महिला सक्षमीकरणाचं एक उत्तम उदाहरण आहे. एकमा गावातील या सात बहिणी खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाची जाणीव करून देत आहेत. त्यामुळं त्यांच्या पालकांचंही कौतुक करावं, तेवढं कमीच आहे. कारण सात मुली असूनही पालकांनी त्यांना कधीच ओझं समजलं नाही. उलट त्यांना शिक्षण देऊन सक्षम केलं. त्यामुळं पालकांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी या मुलींनी करुन दाखवली आहे.
नातेवाईकांनी पालकांना मारले टोमणे : आजही देशात मुलींना ओझं समजलं जातं. हरियाणा, महाराष्ट्रातील बीड सारख्या जिल्ह्यात मुलींची भ्रूणहत्या केली जाते. मुलगी जन्माला येताच पालकांना तिच्या पालनपोषणाची चिंता वाटू लागते. तसंच मुलींच्या शिक्षणाकडं फारसं लक्ष देताना पालक आजही दिसत नाहीत. त्यामुळं ग्रामीण भागात आजही बालविवाहाचं प्रमाण दिसून येतं. मात्र, असं असतानाही छपरा जिल्ह्यातील एकमा येथील रहिवासी असलेल्या कमल सिंह यांनी मुलींना शिक्षण देवून सक्षम केलंय. त्यांना एक-दोन नव्हे तर सात मुली आहेत. त्यामुळं त्यांना देखील समाजाचे टोमणे ऐकावे लागले. त्याचे नातेवाईक देखील त्यांना टोमणे मारायचे. मात्र, त्यांनी या सर्वांकडं दुर्लक्ष करत आपल्या सातही मुलींना पाठिंबा दिला. त्यामुळंच आज त्यांच्या सातही मुलींनी आकाशाला गवासणी घातलीय.
"आमची परिस्थिती चांगली नव्हती, म्हणून आम्हाला गाव सोडावं लागलं. कसंतरी आम्ही त्यांना शिकवलं. जोपर्यंत त्यांना नोकरी मिळत नाही, तोपर्यंत त्यांनीही हार मानली नाही. आज सातही मुली बिहार पोलिसात सेवा देत आहेत. तसंच मला माझ्या मुलींचा खूप अभिमान आहे. " - कमल सिंह, वडील
सातही मुलींना मिळाली सरकारी नोकरी : एकमा गावात राहणारे कमल सिंह व्यवसायानं पिठाची गिरणी चालवणारे छोटे उद्योजक होते. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसताना त्यांच्या घरी एकामागून एक सात मुलींचा जन्म झाला. त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. सात मुलींचं लग्न लवकर करावं यासाठी नातेवाईकांनी सिंह यांच्यावर दबाव होता. त्यावर त्यांनी नातेवाईकांचा दबाव धूडकावत मुलींवर विश्वास दाखवला. त्यामुळं त्यांच्या मुलींनाही यशाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत झाली. पालकांनी दाखवलेला विश्वास मुलींनी सार्थ ठरवत, राज्य पोलीस दलाव्यतिरिक्त निमलष्करी दलात नोकरी मिळवली.
बहिणी झाल्या एकमेकींच्या आधार : 2006 मध्ये मोठ्या बहिणीची सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी निवड झाली. त्यानंतर इतर बहिणींची हिंमत वाढली. दुसरी बहीण राणी हिची लग्नानंतर 2009 मध्ये बिहार पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली. यानंतर इतर पाच बहिणीही विविध दलात नियुक्त झाल्या. बहिणींनी एकमेकींना मार्गदर्शन करत विविध पदावर मजल मारली.
मुलींना कमी न समजता सक्षम करा : कमल सिंह यांनी सांगितलं की, त्यांना सात नव्हे, तर आठ मुली होत्या. पहिल्या 5 मुली झाल्यानंतर परत दोन जुळ्या मुली झाल्या. त्यानंतर एक मुलगा झाला. त्यानंतर दुसरी सर्वात लहान मुलगी झाली. मात्र एका मुलीचा काही कारणानं मृत्यू झाला. माझ्या मुलींना मी कधीही ओझं समजलं नाही. उलट समाजाचा विरोध झुगारून मुलींना शिक्षण दिलं. त्यामुळं माझ्या मुलींनी जिद्द तसंच मेहनतीच्या जोरावर पोलीस दलासह निमलष्करी दलात नोकरी मिळवली. प्रत्येकानं मुलींना कमी न समजता त्यांना योग्य शिक्षण देऊन त्यांना सक्षम करावं.
'माझ्या मुली माझ्यासाठी वरदान': कमल सिंह यांच्या सात मुली त्यांच्यासाठी वरदान ठरल्या आहेत. मुलींच्या मेहनतीमुळं त्यांच्या सामाजिक परिस्थितीत आज बदल झाला आहे. सातही मुलींनी एसएसबी, जीआरपी, बिहार पोलीस, सीआरपीएफ, उत्पादन शुल्क विभागात रुजू होत समाजाचं तोंड बंद केलंय. कमल सिंह म्हणाले, "मला पोलिसांची तिरपी टोपी खूप आवडते. मुलींच्या मेहनतीमुळं माझ्या सर्व मुलीं ही टोपी घालण्यास सक्षम झाल्या आहेत."
वडिलांना चार मजली घर भेट : वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं सर्व मुली त्यांना आधार देत आहेत. वडिलांना त्यांनी वृद्धापकाळात आधार देत एकमा बाजार, छपरा येथे चार मजली घर बांधून भेट दिलं आहे. वडील कमल सिंह सांगतात की, त्यांनी ते घर भाड्यानं दिलं आहे. ज्यातून त्यांना महिन्याला 18-20 हजार रुपये मिळतात. त्यामुळं आम्हाला पैशाची कोणतीही अडचण येत नाही.
लहानपणी सर्वांना सांभाळणं अवघड : शारदा देवी यांनी सांगितलं की, "सर्व सात मुली लहान असताना त्यांना सांभाळणं खूप कठीण होतं. एकाचवेळी सर्वांना खायला घालणं, शिकवणं शक्य नव्हतं. तरीही, आम्ही त्यांना सक्षम बनवलं. त्यामुळं समाजात माझ्या मुलींमुळं आम्हाला सन्मान मिळतोय".
'बहिणी संपत्तीत वाटा मागतील ': राजीव सिंह म्हणाले की, "मला सात बहिणी असल्यामुळं गावातील लोक टोमणे मारायचे. बहिणी जास्त असल्यामुळं त्या वडिलांच्या संपत्तीत वाटा मागतील, असंही अनेकांनी मला सांगितलं. मात्र, माझ्या बहिणींवर आमचा विश्वास आहे. त्या आमच्याकडून काहीही घेणार नाहीत. उलट माझ्या बहिणींनी आमच्यासाठी खूप काही केलंय. मला माझ्या सात बहिणींचा अभिमान असून मी त्यांचा भाऊ असल्याचा गर्व आहे".
हे वाचलंत का :