नवी दिल्ली Supreme Court : अजित पवार गटाकडून शरद पवारांचं नाव आणि फोटोचा दुरुपयोग केला जात असल्याची, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाकडून लेखी उत्तर मागवलं आहे. पुढील सुनावणीपर्यंत अजित पवार गटानं शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरू नये, असा सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला. त्यासोबत लेखी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत अजित पवार गटावर आरोप लावले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी 18 मार्चला होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि घड्याळ चिन्ह बहाल केलं होतं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूनं निर्णय दिला होता. त्यानंतर या निर्णयाविरोधात शरदचंद्र पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज (14 मार्च) सुनावणी पार पडली. यावेळी शरद पवार गटानं, अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा करत फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावर आक्षेप नोंदवला. यावर सुप्रीम कोर्टानं शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरु नका, असे आदेश दिले आहेत.
सुनावणीत नेमकं काय झालं : सर्वोच्च न्यायालयात आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठावर समोर सुनावणी झाली. यावेळी अजित पवार यांचा पक्ष वेगळा असून शरद पवारांचा फोटो का वापरतात? तसंच शरद पवारांची लोकप्रियता वेगळी आणि तुमचा राजकीय पक्ष वेगळा आहे. त्यामुळं शरद पवारांचा फोटो आणि नाव कुठंही वापरणार नाही अशा प्रकारचं हमीपत्र न्यायालयात लिहून द्या, असे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फटकारलं. सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करत शरद पवारांच्या लोकप्रियतेचा वापर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तर सोमवारपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला हमीपत्र लिहून देण्याची मुदत देण्यात आली आहे.
जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया : आज पार पडलेल्या सुनावणी संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, त्यांच्याकडं अनेक दिग्गज नेते आहेत, पण आमच्याकडं एकटे शरद पवार आहेत. इतके मोठे नेते असताना पवारांचा फोटो का वापरतात, असा सवाल आम्ही यापूर्वी देखील उपस्थित केला होता. आज न्यायालयानंही तेच म्हटलंय. शरद पवारांना हरवण्याची भाषा करत आहात, तर स्वतः नवीन पक्ष काढा, नवं चिन्ह घ्या आणि लढा", असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
नावाचा आणि फोटोचा वापर केला नाही : या प्रकरणी अजित पवार गटाची बाजू मांडत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण म्हणाले की, "शरद पवार यांनी माध्यमांसमोर तसंच मंचावर आवाहन केलं होतं की, माझ्या फोटो आणि नावाचा वापर कोठेही करण्यात येऊ नये. त्यानंतर कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार) त्यांच्या फोटोचा अथवा नावाचा वापर करण्यात आलेला नाही."
हेही वाचा -
- BJP ShivSena Differences : लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाण्यात महायुतीमध्ये तणाव; अजित पवार गट, भाजपा, शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर
- Ajit Pawar News : 'यशवंतरावांच्या आदर्शानुसार वाटचाल करताना अशा गोष्टी...', अजितदादांनी वाचाळवीरांना फटकारलं
- Loksabha Election 2024 : कल्याणची जागा जिंकायची आहे ना? अजित पवार गटाचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा