नवी दिल्ली : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री याच्यावर सध्या महायुतीच्या नेत्यांमध्ये बराच खल सुरू आहे. मात्र अद्यापही त्यात यश आलं नाही. गुरुवारी रात्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांच्याशी तब्बल अडीच तास चर्चा केली. मात्र तरीही मुख्यमंत्री पदावर सस्पेंस कायम आहे. त्यामुळे उबाठा खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. "दिल्लीनं डोळे वटारले की, एकनाथ शिंदे यांना गप्प बसावं लागेल. त्यामुळे महायुतीनं स्वाभिमानाच्या गप्पा करू नयेत," असा जोरदार टोला त्यांनी लगावला. संजय राऊत यांची ही टीका सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे.
मुख्यमंत्री जो कोणी ठरेल, त्याचं स्वागत करू : "लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. मात्र कसंही आलं असलं, तरी बहुमत महायुतीकडं आहे. त्यामुळे महायुतीनं कोणालाही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलं, तरी आम्ही त्याचं स्वागत करू," असं संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महायुतीनं स्वाभिमानाच्या गप्पा करू नये : "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीनं यश मिळवलं आहे. मात्र महायुतीला मिळालेला हा विजय कसा मिळवला, यावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. पुण्यात बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. भलेही अण्णा हजारे झोपले असतील, मात्र बाबा आढाव यांनी केलेल्या आंदोलनाची जनता दखल घेईल. मात्र दिल्लीनं डोळे वटारल्यानंतर एकनाथ शिंदे यांना गप्प बसावं लागेल. मग आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी उपमुख्यमंत्री पद घेतलं, असं सागावं लागेल. जसं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेल्या बहुमतानंतर यांचा मुख्यमंत्री दिल्लीतून ठरतो. त्यामुळे महायुतीनं स्वाभिमानाच्या गप्पा करू नयेत," अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा :