हैदराबाद Ramoji Rao Success in Media : मीडिया हा व्यवसाय नाही, तर समाजाला जागृत करणारं माध्यम आहे, असा रामोजी रावांचा विश्वास होता. 1969 मध्ये, रामोजी राव यांनी अन्नदाता मासिकाच्या माध्यमातून मीडिया क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. शेतकरी कुटुंबात जन्मलेले रामोजी राव अनेक शेतकरी कुटुंबांचे आधारवड बनले. त्यांनी कृषी समुदायात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. अन्नदाता मासिकाच्या माध्यमातून त्यांनी कृषी विज्ञान केंद्रं आणि शेतकरी यांच्यात एक अतूट पूल बांधला. त्यांनी शेतीच्या प्रगत पद्धती, तांत्रिक पद्धती, नवीन यंत्रं याविषयी अविरत माहिती दिली. मात्र या पलिकडं त्यांनी माध्यम क्षेत्रात केलेली क्रांती जगभरात नावाजली गेली.
रामोजी राव यांनी 1974 मध्ये माध्यम क्षेत्रातील पुढचं आणि अत्यंत महत्वपूर्ण पाऊल उचललं. विशाखापट्टणममध्ये केंद्रीत असलेलं ईनाडू, आज सर्वाधिक प्रसारित असलेलं तेलुगू दैनिक आहे. सार्वजनिक समस्यांशी बांधिलकी आणि सत्याशी निष्ठा, नेहमी मूलभूत वैशिष्ट्ये म्हणून अंतर्भूत केलेलं हे दैनिक आज तेलुगू वाचकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलंय. म्हणूनच आजचं संचलन, जे 1976 च्या पूर्वार्धात 48,339 प्रती होते, ते टप्प्याटप्प्यानं वाढलंय आणि 2011 च्या पूर्वार्धात उच्च पातळीवर पोहोचलं आहे. कोरोना महामारीच्या काळात वर्तमानपत्रांचं काम संपुष्टात येईल, असं अनेकांना वाटत असतानाच आजही ईनाडू दैनिक 23 मोठ्या शहरातून छापलं जाते.
ईनाडू : तेलुगू लोकांच्या स्वाभिमानाचा ध्वज : ईनाडू ही केवळ बातमी नाही, तर हा तेलुगू लोकांचा स्वाभिमानाचा ध्वज आहे. 1978 ते 1983 या काळात काँग्रेस नेतृत्वानं पाच वर्षांत आंध्र प्रदेशचे चार मुख्यमंत्री बदलले. त्या वेळी तेलुगू राष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करण्यासाठी 'तेलुगू देशम' एक नवीन राजकीय शक्ती म्हणून उदयास आली. 1983 च्या विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी आपल्या संपादकीय लेखात रामोजी राव यांनी हुकूमशाहीचा प्रतिकार करणं हाच आमचा उद्देश असून आम्ही तेलुगू देसमच्या पाठीशी उभं आहोत, असं स्पष्ट केलं. एनटीआरच्या कारकिर्दीत झालेल्या चुका ईनाडूनं निडरपणे सर्वांसमोर आणल्या. 1984 मध्ये काँग्रेसनं एनटीआर सरकार उलथून टाकलं, तेव्हा ईनाडूनं लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी लढा दिला.
इनाडूचा डिजिटल विस्तार : 1999 मध्ये जगभरातील तेलुगू लोकांना ताज्या बातम्या जलद आणि वेळेवर पोहोचवण्याच्या महत्त्वाकांक्षेनं Eenadu.net लाँच केलं गेलं. रामोजी राव यांनी दोन दशकं न्यूजटाइम या इंग्रजी दैनिकाचं यशस्वी नेतृत्व केलं. 26 जानेवारी 1984 रोजी सुरू झालेल्या या संस्थेनं शेकडो पत्रकारांना संधी उपलब्ध करुन दिल्या.
तेलुगू टेलिव्हिजनमध्ये क्रांती : प्रिंट मीडियानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये रामोजी राव यांनी सुरू केलेला ईटीव्ही, तेलुगू टीव्हीला प्रतिक मानलं जाते. ईटीव्हीनं 27 ऑगस्ट 1995 ला तेलुगूमधील पहिलं 24-तास चॅनल सुरू करुन व्हिज्युअल मीडियामधील रुढीवादी पद्धती बदलल्या. ईटीव्हीचा पहाटेचा कार्यक्रम ‘अन्नदाता’ कापणीच्या जागरणाची शिकवण देतो. तर रामोजी राव यांनी दिवंगत एसपी बाला सुब्रमण्यम यांच्यासोबत आयोजित केलेल्या ‘पदुथा त्यागा’ या कार्यक्रमानं चित्रपटसृष्टीला शेकडो गायक दिलेत. ‘स्टार वुमन’ सारख्या कार्यक्रमानं गिनीज बुकमध्ये प्रवेश केला. तर ‘जबरदस्थ’ हा कॉमेडी शो प्रेक्षकांना आजही हसवतोय. त्यांनी ईटीव्हीवर लोकांचं मनोरंजन करणारे अनेक कार्यक्रम दिले.
ETV नेटवर्कचा विस्तार : मानवी संबंधांना महत्त्व देत आणि सांस्कृतिक परंपरा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवत, ETV नेटवर्क आज विविध राज्यांमध्ये विस्तारलं आहे. एप्रिल 2000 मध्ये, ईटीव्ही बांगला सुरू झालं, त्यानंतर तीन महिन्यात मराठी वाहिनी सुरू झाली. आणखी पाच महिन्यात ईटीव्ही कन्नडचं प्रसारण सुरू झालं. ऑगस्ट 2001 मध्ये ईटीव्हीनं उर्दूमध्ये प्रसारण सुरू केलं. तर जानेवारी 2002 मध्ये रामोजी राव यांनी एकाच दिवशी सहा चॅनेल सुरू करुन मीडियाच्या इतिहासात आणखी एक खळबळ उडवून दिली. सध्याच्या स्थितीला प्रादेशिक भाषेतील चॅनेलसह ईटीव्ही हे लोकांपर्यंत पोहोचणारं एक विशाल नेटवर्क बनलं आहे.
तेलुगू भूमीवर माहितीचा प्रसार करण्यासाठी डिसेंबर 2003 मध्ये रामोजी राव यांनी ETV-2 वृत्तवाहिनी सुरू केली. राज्याचं विभाजन झाल्यानंतर, ETV आंध्र प्रदेश आणि ETV तेलंगणा सुरू झालं, जे ताज्या बातम्या, विश्लेषण आणि वास्तविक जीवनातील कथा देतात.
रामोजी राव यांनी प्रेक्षकांच्या आवडीनुसार ईटीव्ही नेटवर्कचा विस्तार केला. ईटीव्ही प्लस, ईटीव्ही सिनेमा, ईटीव्ही अभिरुची आणि ईटीव्ही स्पिरिच्युअल यांसारखे चॅनेल तयार केले. विविध कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. भविष्याचा अंदाज घेत, रामोजी राव यांनी ईटीव्ही भारत सोबत सर्वात मोठा डिजिटल मीडिया विभाग तयार केला. 13 भाषांमध्ये बातम्या देणारं सर्वात मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म, भारताचे माहितीचे शस्त्र बनलं. दरम्यान, रामोजी राव यांचा मीडियामधील प्रवास, प्रिंट ते इलेक्ट्रॉनिक ते डिजिटल, नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्टतेचा त्यांचा अथक प्रयत्न दर्शविते. आज रामोजी राव या माध्यम सम्राटाचं निधन झालं, त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.