लखनौ Ram Temple Effect On Gold : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचा जल्लोष देशभर दिसून येत आहे. देशभर दिवाळीचा जल्लोष असल्याचं राम मंदिर सोहळ्यावरुन स्पष्ट होत आहे. त्यातच आता सोन्याचा भावही गगणाला भीडत आहे. रामभक्त सोन्याच्या अंगठीवर प्रभू श्रीरामाची प्रतिमा आणि पेंडेंट बनवत आहेत.
राम मंदिर प्रतिकृती अंगठीची मागणी वाढली : राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी रामभक्त सोन्याच्या अंगठीवर राममंदिराची प्रतिकृती बनवत आहेत. राम मंदिराच्या संबंधित विविध सोन्याच्या प्रतिकृती राजधानीतील घाऊक व्यापाऱ्यांकडं विकले जात आहेत. सराफा व्यापारी आदिश जैन यांच्या दुकानातही राम मंदिरांच्या संबंधित दागिने विकली जात आहेत. विशेष म्हणजे आदिश जैन यांनाही श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. याबाबत बोलताना आदिश जैन यांनी " देशातील वातावरण राममय झालं आहे. आमच्यआकडं लोक श्रीरामांशी संबंधित दागिन्यांची मागणी करत आहेत. आमच्याकडं राममंदिर प्रतिकृतीच्या अंगठ्या आणि पेंडंटला मोठी मागणी आहे. आम्ही ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकत नाही. कारण आम्हाला मोठ्या प्रमाणात ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत," असं त्यांनी यावेळी सांगितलं.
रामभक्तांकडून मोठ्या प्रमाणात मिळाल्या ऑर्डर : आदिश जैन यांनी सांगितलं की, "जय श्रीराम लिहिलेल्या अंगठी आणि पेंडेंटला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मंदिराच्या आकारातील अंगठ्या आणि पेंडेंटही हातोहात तविकले जात आहेत. आम्हला मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्यामुळं आम्ही सगळ्याच ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकत नाही. आता येणाऱ्या ऑर्डर्स आम्ही 22 जानेवारीनंतर पूर्ण करू शकणार आहोत. गळ्यात घालण्याचं लॉकेट 5 ते 10 ग्रॅमपर्यंतचं असते. मात्र काही रामभक्त ग्राहकांनी 15 ते 25 ग्रॅम पेंडेंट बनवलं आहे." रामजन्मभूमी सोहळ्याचा तरुणाईमध्ये मोठा उत्साह आहे. त्यामुळं तरुणाई सोन्याच्या अंगठ्यांवर राम मंदिर चितारुन घेत आहेत.