अमेठी Ram devotee Shabnam Reached Amethi : रामनगरी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्टेनंतर रामाच्या दर्शनासाठी देशभरातून तसंच जगभरातून रामभक्त येत आहेत. काही भाविक अनेक किलोमीटरचा प्रवास करून पायी निघाले आहेत. मुंबईची शबनम शेख हीदेखील या भाविकांपैकी एक आहे. मुस्लिम समाजातील असूनही तिची लहानपणापासूनच प्रभू श्रीरामांवर श्रद्धा आहे. राम मंदिर उद्घाटनापुर्वी ती मुंबईहून पायीच अयोध्येला रवाना झाली होती. शनिवारी अमेठीत पोहोचल्यावर तिचं जंगी स्वागत करण्यात आलं. तिच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यादरम्यान रामलल्लाच्या या अनोख्या भक्तानं धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांवर निशाणा साधलाय. तिनं म्हटलं की, "राज्यघटनेनं अधिकार दिला. मी मंदिरात तसंच चर्चमध्ये जाऊ शकते. तसंच देश फतव्यांनी नव्हे तर संविधानानं चालतो."
1500 किमीहून अधिक पायी प्रवास : मुंबईची रहिवाशी असलेली शबनम शेख 21 डिसेंबर 2023 रोजी पायी चालत मुंबईहून अयोध्येला निघाली. ती बीकॉमच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिचे मित्र रमण राज शर्मा, विनीत पांडे आणि आणखी एक तरुण तिच्यासोबत आहे. आतापर्यंत तिनं 1500 किमीहून अधिक प्रवास केलाय. तिनं उत्तर प्रदेशात प्रवेश केला असून फतेहपूरमार्गे ती शनिवारी अमेठीला पोहोचली. यावेळी राणीगंज बाजारपेठेत सर्व स्त्री-पुरुष भक्तांनी जय श्री रामच्या जयघोषात तिचं स्वागत केलं. तसंच तिच्यावर फुलांचा वर्षाव केला. तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. यावेळी रामभक्तांनी अल्पोपहार देऊन तिचं स्वागत केलं.
कोणत्याही मौलानांना काही अडचण असेल तर त्यांनी माझ्याशी बोलावं : शबनमनं यावेळी जय श्रीराम म्हणत माध्यमांशी संवाद सुरू केला. तिनं सांगितलं की, " प्रभू रामाच्या दर्शनासाठी पायी जात होती. प्रवासाला 38 दिवस पूर्ण झाले आहेत. माझा रामावरचा विश्वास अचानक निर्माण झाला नाही. माझी रामजींवर लहानपणापासून श्रद्धा आहे. मी स्वतःला भारतीय सनातनी मुस्लिम समजते. मी मुंबईत राहते, तो संपूर्ण परिसर हिंदूंचा आहे. मी लहानपणापासून त्यांच्यात वाढले आहे. मी अजानसोबत भजनंही ऐकली आहेत. त्यामुळं त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. मी प्रत्येक हिंदू सणात सहभागी झाले आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव खूप प्रसिद्ध आहे. फक्त मीच नाही तर माझं संपूर्ण कुटुंब गणपती बाप्पाच्या विसर्जनात पूर्ण सहकार्य करते." मुस्लिम धर्मगुरुंबाबत विचारलेल्या प्रश्नावर शबनम शेख म्हणाली की, "देश फतव्यानं नव्हे तर संविधानानं चालतो. कोणत्याही मौलानाशी काही अडचण असेल तर त्यांनी थेट माझ्याशी बोलावं. मी उत्तर द्यायला तयार आहे. ओवैसीजी अनेकदा म्हणतात की, देश फतव्यानं नव्हे तर संविधानानं चालतो. संविधानानं मला मंदिर, मशीद आणि चर्चमध्ये जाण्याचा अधिकार दिलाय."
हेही वाचा :
- रामलल्लाच्या दर्शनासाठी स्वत: हनुमानजी आले! प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्याच दिवशी राम मंदिरात काय घडलं?
- अयोध्यातील राम मंदिरात प्रचंड गर्दी पाहता, मंदिर प्रशासनानं वेळेच्या बाबतीत घेतला मोठा निर्णय
- वडाळ्यातील राम मंदिर भाविकांनी दुमदुमलं, अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध