चित्रदुर्ग (कर्नाटक) Pre Wed Shoot In Hospital : कर्नाटकातल्या चित्रदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. इथल्या भारमसागर गावातील सरकारी रुग्णालयात प्री-वेडिंग शूटचा भाग म्हणून एका व्यक्तीचं चक्क बनावट ऑपरेशन करण्यात आलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी बडतर्फ केलं : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टर दाम्पत्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. याची माहिती जिल्हाधिकारी टी व्यंकटेश यांना मिळताच, त्यांनी डॉ. अभिषेक यांना बडतर्फ करण्याचे आदेश जारी केले. ते रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून कार्यरत असून आक्षेपार्ह वागणूक आणि कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यानं त्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आलं.
डॉक्टरची भूमिका साकारली : रिपोर्ट्सनुसार, डॉ. अभिषेक लवकरच लग्न करणार होते. व्हिडिओमध्ये त्यांनी ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरची भूमिका साकारली असून त्यांची भावी पत्नी त्यांना यात मदत करत आहे. व्हिडिओच्या शेवटी, काही सेकंदांचा एक भाग आहे ज्यामध्ये रुग्ण तिथे बसलेला आणि झोपलेला असून त्याचं ऑपरेशन झाल्याचं दिसतंय.
ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग शूट : या घटनेबाबत चित्रदुर्गच्या डीएचओ डॉ. रेणू प्रसाद यांनी सांगितलं की, "एनएचएममध्ये कंत्राटी पद्धतीनं वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. त्या म्हणाले की, ऑपरेशन थिएटर काही महिने बंद होतं. डॉक्टरांनी त्याच थिएटरमध्ये प्री-वेडिंग शूट केलं. आम्ही भरमसागर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे. याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू."
कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया : या प्रकरणी कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर सांगितलं की, चित्रदुर्गातील भरमसागर सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये लग्नापूर्वीचे फोटोशूट करणाऱ्या डॉक्टरला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. ते म्हणाले की, शासकीय रुग्णालयांमध्ये असे गैरप्रकार घडू नयेत, यासाठी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना मी यापूर्वीच दिल्या आहेत. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकार अशा वैद्यकीय सुविधा पुरवते, हे सर्वांनी लक्षात ठेवावं, असं मंत्री म्हणाले.
हे वाचलंत का :