द्वारका(गुजरात) Sudarshan Setu Inaugurate : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन (India Longest Cable Stayed Bridge) केलंय. यातील एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे 'सुदर्शन सेतू'. भारतातील सर्वात लांब केबलवरील हा पूल आहे. तब्बल 2.5 किलोमीटर लांबीचा हा सर्वात मोठा केबलवरील पूल आहे. सुमारे 980 कोटी रुपये खर्चून बांधलेला 'सुदर्शन सेतू' पूल ओखा-बेट द्वारका 'सिग्नेचर ब्रिज' म्हणूनही ओळखला जातो. द्वारकाधीश मंदिरात येणाऱ्या पर्यटकांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्याधुनिक सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. हा भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल आहे. सुदर्शन सेतू आपल्या विविध वैशिष्ट्यांसाठी जगभरात ओळखला जाणार आहे. सुदर्शन सेतू पुलाच्या उद्घाटनामुळे या मार्गावरून भाविकांना सहज प्रवास करता येणार आहे. द्वारका आणि बेटद्वारकेला जाणाऱ्या प्रवाशांना या भक्तिमार्गावर अनेक चमत्कारीक अनुभव येणार आहेत.
980 कोटी रुपये खर्च : सुदर्शन सेतूची मागणी अनेक दिवसांपासून होती. हा केबल पूल बांधण्यासाठी एकूण 980 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तारांवर बांधलेला हा पूल देशातील सर्वात सुंदर केबल ब्रिज ठरला आहे. हा पूल सुमारे 980 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलाय. हा पूल सुमारे 2.32 किलोमीटर लांब आहे. आता हा देशातील सर्वात लांब केबल आधारित पूल बनलाय. पुलाच्या दोन्ही बाजूला भगवद्गीतेतील श्लोक आणि भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमांनी सजवलेले फूटपाथ आहेत. विशेष म्हणजे फूटपाथच्या वरच्या भागात सोलर पॅनल बसवण्यात आले असून, त्यातून एक मेगावाट वीजनिर्मिती होते. पूल बांधण्यापूर्वी बेटद्वारकेला यात्रेसाठी जाणाऱ्या लोकांना बोटींवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. हा प्रकल्प कार्यक्षम अभियांत्रिकीचा चमत्कार म्हणून गौरवला जातोय.
सुदर्शन सेतू का आहे खास? :
- ओखा आणि बेटद्वारका यांना जोडणारा चार पदरी 'सिग्नेचर ब्रिज' हा 900 मीटर लांबीच्या सेंट्रल केबल मॉड्यूलवर बांधला गेलाय.
- ओखा आणि बेटद्वारकाच्या दोन्ही बाजूला 2452 मीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. या पुलाची एकूण लांबी 2320 मीटर आहे.
- पुलाच्या मुख्य स्पॅनची लांबी 500 मीटर आहे. पुलाच्या मुख्य भागात 130 मीटर उंचीचे दोन पिलर आहेत. बोटीनं प्रवास करण्यासाठी पूर्वी लागणाऱ्या 30 ते 40 मिनिटांपेक्षा आता खूप कमी वेळ लागणार आहे.
- पादचाऱ्यांसाठी व्ह्यूइंग गॅलरीही देण्यात आलीय. त्या ठिकाणाहून बेटद्वारका आणि समुद्राचं सुंदर दृश्य पर्यटकांना अनुभवता येईल. वाहनांशिवाय या पुलावरुन पायी, सायकल आणि गोल्फ कार्टनं जाता येणार आहे.
- रात्रीच्या वेळी पुलावर रोषणाईची व्यवस्था करण्यात आलीय. ज्यामुळं पुलाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. अशा स्थितीत हा 'सिग्नेचर ब्रिज' पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
- येथे भगवद्गीतेतील श्लोकसुद्धा एकायला मिळणार आहेत. तसंच उत्तम प्रकारचं कोरीव कामंही येथे करण्यात आलंय. त्यामुळं तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाचा विकास होईल, अशी आशा येथील प्रशासनाला आहे.
- 'सिग्नेचर ब्रिज'मध्ये यात्रेकरुंना काही विशेष सुविधाही दिल्या जाणार आहेत. पुलाच्या आधी वाहनं उभी करण्यासाठी ओखाच्या दिशेनं वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या चारपदरी पुलाची रुंदी 27.20 मीटर आहे. ज्यात दोन्ही बाजूला 2.50 मीटरचं फूटपाथ बांधण्यात आले आहेत.
- फूटपाथवर बसवलेल्या सोलर पॅनल्समुळं एक मेगावाट वीजनिर्मिती होणार आहे. त्याचा उपयोग पुलावरील लाईटसाठी केला जाणार आहे. ओखा गावाच्या आवश्यकतेसाठी अतिरिक्त वीज देण्यात येणार आहे.
द्वारकाधीशांचं दर्शन होणार सोपं : या पुलामुळं बेटद्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात येणाऱ्या भाविकांना बोटीनं द्वारकेला जाण्याची आता गरज राहणार नाही. याशिवाय बेटद्वारकेतील नागरिकांना आवश्यक सुविधाही सहज उपलब्ध होणार आहेत. या पुलामुळं स्थानिकांनी आनंद व्यक्त केलाय. ज्यांना द्वारकाधीशांचं दर्शन घेता येत नव्हतं, त्यांना आता सहज दर्शन घेता येणार आहे. तसंच या पुलाच्या उभारणीमुळं इथं झपाट्यानं विकास होणार आहे. हा पूल पर्यटकांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :