मॉस्को/ नवी दिल्ली PM Modi Russian Civilian Honour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द प्रेषित द फर्स्ट-कॉल्ड', हा रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्कोमधील क्रेमलिनच्या सेंट कॅथरीन हॉलमध्ये पंतप्रधान मोदींना या पुरस्कारानं सन्मानित केले. रशिया आणि भारत यांच्यातील विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणि दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
#WATCH | Russian President Vladimir Putin confers Russia's highest civilian honour, Order of St Andrew the Apostle on Prime Minister Narendra Modi. pic.twitter.com/aBBJ2QAINF
— ANI (@ANI) July 9, 2024
हा सन्मान भारतीयांना समर्पित : रशियाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी पुतीन यांचे आभार मानले. तसंच हा सन्मान ते भारतातील लोकांना समर्पित करणार असल्याचं सांगितलं. हा सन्मान माझ्या एकट्याचा नाही तर 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसंच भारत आणि रशिया यांच्यात शतकानुशतकं जुनी मैत्री आणि परस्पर विश्वासाचा आदर आहे. आमच्या विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीचा हा सन्मान आहे. गेल्या अडीच दशकात तुमच्या (पुतिन) नेतृत्वाखाली भारत-रशिया संबंध प्रत्येक दिशेनं मजबूत झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नवीन उंची गाठली आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले. दोन्ही देशांदरम्यान तुम्ही जो धोरणात्मक संबंधांचा पाया घातला होता तो काळाच्या ओघात मजबूत होत गेला. लोकसहभागावर आधारित आमचे परस्पर सहकार्य दोन्ही देशांच्या लोकांसाठी चांगल्या भविष्याची आशा आणि हमी बनत असल्याचंही मोदी म्हणाले.
भारत-रशिया संबंध संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे : भारत-रशिया संबंध केवळ दोन देशांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आजच्या जागतिक परिस्थितीत भारत आणि रशिया यांच्यातील भागीदारी अधिक महत्त्वाची बनली आहे. जागतिक स्थैर्य आणि शांतता यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत असं दोन्ही देशांचं मत आहे. आगामी काळात या दिशेनं एकत्र काम करू, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा :