नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जाताना भाजपा खासदार आणि विरोधकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपाच्या दोन खासदारांना धक्का मारल्यानं ते जखमी झाल्याचा आरोप भाजपाच्या खासदारांनी केला. त्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. भाजपा खासदारांच्या तक्रारीवरुन विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संसदेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार राडा : संसद परिसरात विरोधक आणि सत्ताधारी खासदार गुरुवारी आमनेसामने आले. यावेळी खासदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. याबात आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. संसद परिसरात झालेल्या खासदारांच्या धक्काबुक्कीत ओडिशातील बालासोर इथले भाजपा खासदार प्रतापचंद्र सारंगी जखमी झाले आहेत. प्रतापचंद्र सारंगी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्का दिल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला, त्यानंतर तो खासदार माझ्या अंगावर पडल्यानं मी जखमी झालो, असा आरोप त्यांनी केला. याच घटनेत फर्रुखाबाद इथले भाजपा खासदार मुकेश राजपूतही जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल : भाजपाच्या खासदारांना धक्काबुक्की करुन जखमी केल्यानं राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109 (हत्येचा प्रयत्न) लावलेलं नाही. संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये कलम 117 (दुखापत करणे), 115 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), 125 (इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारी कृती). कलम 351 (गुन्हेगारी धमकी) आणि 3(5) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "आपल्याला संसदेत जाताना भाजपा खासदारांनी रोखल्यामुळे ही घटना घडली," अशी माहिती राहुल गांधी यांनी माध्यमांना दिली.
हेही वाचा:
- खासगी दौऱ्यावर आलेल्या खा. राहुल गांधी यांना महाबळेश्वरकरांनी दिलं 'हे' गिफ्ट, दौऱ्याचं नेमकं कारण काय?
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024: अमित शाहांविरोधात विरोधकांचं जोरदार आंदोलन; राहुल गांधींंच्या धक्क्यानं भाजपा खासदार जखमी झाल्याचा आरोप
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : विरोधी पक्षातील नेत्यांनी संविधान खिशातच ठेवलं, तर भाजपानं . . . . राजनाथ सिंहांचा हल्लाबोल