नवी दिल्ली Parliament Monsoon Session 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प 2024 संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात निधी न मिळाल्याचा आरोप करत विरोधकांनी संसदेसमोर चांगलाच गदारोळ केला. विरोधकांनी आंदोलन करुन सरकारविरोधात चांगलीच घोषणाबाजी केली. मात्र दुसरीकडं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शून्य प्रहराचं कामकाज सुरू करण्यात आलं.
एनडीएची सत्ता असलेल्या राज्यांना भरघोस निधी : विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 वर जोरदार टीका केली. यावेळी विरोधकांनी एनडीएची सत्ता नसलेल्या राज्यांना निधी न दिल्याचा आरोप केला. संतप्त झालेल्या विरोधकांनी बुधवारी सकाळी संसदेसमोर निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया ब्लॉक पक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षांचे नेते चर्चा करुन रणनीती ठरण्यासाठी एकत्र आले. विरोधी पक्षनेत्यांच्या मते अर्थसंकल्पात अयोग्य वाटप करण्यात आलं आहे. एनडीएची सत्ता असलेल्या राज्यांना भरघोस निधी देण्यात आला. तर एनडीएची सत्ता नसलेल्या राज्यांना निधी देण्यात आला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.
बिहार आणि आंध्रप्रदेशला भरघोस निधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प 2024 संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहार राज्यातील रस्ते आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी तब्बल 26 हजार कोटीचा निधी जाहीर केला. तर आंध्रप्रदेश राज्याला तब्बल 15 हजार कोटीचा निधी देण्यात आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी मदत केल्यानं हा निधी त्यांना देण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा :
- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून प्रारंभ; 'या' मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता - parliament budget session
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन रेड टॅबलेट घेऊन संसदेत दाखल, पाहा फोटो - Union budget 2024
- "महागाईनं जनता त्रस्त, महायुती सरकार वसुलीत व्यस्त", विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी - maharashtra monsoon session 2024