लखनौ Mukhtar Ansari Death Updates - मुख्तार अन्सारीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर बांदा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात गुरुवारी रात्री दाखल करण्यात आले. तेथील ९ डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर काही वेळातच अन्सारीचा मृत्यू झाला. मात्र, अन्सारीच्या मृत्यूवरून त्याच्या कुटुंबीयासह विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले.
गुंड ते आमदार अशी कारकीर्द असलेल्या अन्सारीच्या मृत्यूनंतर लखनौतील मेडिकल कॉलेजच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मृतदेहाचे आज सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल. कुटुंबीयांच्या माहितीनुसार गाझीपूरमधील गावात अन्सारीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्तार अन्सारीला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करतानाच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बसपाच्या माजी आमदाराच्या मृत्यूनंतर पोलीस प्रशासन अधिकच सतर्क झाले. पोलीस महासंचालकांनी गाझीपूर आणि मऊसह पूर्वांचलच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला होता. तसेच पोलीस अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काय आहे प्रशासनाचं म्हणणं? तुरुंगाचे पोलीस महासंचालक एस. एन. सबत यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्सारी हा रमजान महिन्यातील रोजा करत होता. उपवास केल्यानंतर त्याची प्रकृती खालावली होती. ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अलिगढ रेंजचे आयजी शलभ माथूर म्हणाले, "मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस प्रशासन सतर्क राहणार आहे. सर्व अधिकारी अफवा पसरविण्यांवर आणि सोशल मीडियावर लक्ष ठेवणार आहेत.
मेडिकल बुलेटिनमध्ये काय म्हटले?बांदा येथील राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील कौशल यांच्या माहितीनुसार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्यानं रुग्णालयात मृत्यू झाला. मेडिकल बुलेटिननुसार, अन्सारीनं गुरुवारी रात्री उलट्या होत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत रात्री ८.२५ वाजता मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. नऊ डॉक्टरांच्या पथकानं त्याच्यावर उपचार केले. मात्र, हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाला, असे मेडिकल बुलिटनमध्ये म्हटले आहे.
पित्याच्या मृत्यूची माहिती माध्यमांमधून समजली- मुख्तार अन्सारीचा मुलगा उमर अन्सारीनं पित्याच्या मृत्यूबाबात संशय व्यक्त केला. तो म्हणाले, " माझ्या वडिलांना स्लो पॉइझन देण्यात आल्याचं आम्ही यापूर्वीच म्हटलं होतं. १९ मार्चला रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाली होती. त्यांच्या मृत्यूबाबत प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. मला माध्यमांमन पित्याच्या मृत्यूबाबात माहिती मिळाली. दोन दिवसांपूर्वी मी भेटायला आल्यानंतर मला परवानगी नाकारण्यात आली. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून आम्ही न्यायालयाकडं दाद मागणार आहोत.
विरोधी पक्षाचा काय आहे आरोप? समाजवादी पक्षाचे नेते अमीक जॅमी म्हणाले "आम्ही मुख्तार अन्सारींच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहोत. त्यांची कधीही हत्या होऊ शकते, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा देण्यात आली नव्हती. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत म्हणाले, "मुख्तार अन्सारींचा तुरुंगात मृत्यू झाल्यानं भाजपाच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्सारींच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे. राज्यात काय सुरू आहे, हे सर्वांना कळते.
न्यायालयाच्या देखरेखीखाली मृत्यूची चौकशी करण्याची मागणी- राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी अख्तार अन्सारीच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले, काही दिवसांपूर्वी अन्सारी यांनी तुरुंगात विष दिल्याची तक्रार करूनही गांभीर्यानं दखल घेण्यात आली नाही. या प्रकाराची घटनात्मक संस्थांनी स्वत:हून दखल घेतली पाहिजे. बिहारचे माजी खासदार पप्पू यादव यांनी अन्सारीचा मृत्यू म्हणजे घटनेची हत्या असल्याचं म्हटलं आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली मृत्यूची चौकशी करण्याची त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी स्वतःहून दखल घेतली पाहिजे, असेही काँग्रेस नेते पप्पू यादव यांनी म्हटले.
हलगर्जीपणा केल्यानं तीन अधिकारी झाले होते निलंबन- गेल्या आठवड्याभराहून अधिक काळ मुख्तारची प्रकृती सातत्याने खालावत होती. प्रकृती बिघडल्यानं माफिया मुख्तार अन्सारीला २६ मार्च रोजी राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी संध्याकाळीच मुख्तारला रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन पुन्हा बांदा कारागृहात पाठवण्यात आले. त्यानंतर पुन्हा गुरुवारी मुख्तारची प्रकृती बिघडली. काही दिवसांपूर्वी मुख्तारनं न्यायालयातील व्हर्च्युअल सुनावणीत तुरुंग प्रशासनाकडून विष दिल्याचा आरोप केला होता. सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा केल्यामुळे एक जेलर आणि दोन डेप्युटी जेलरला निलंबित करण्यात आलं होतं.
वकिलांनीही तुरुंग प्रशासनावर केला होता आरोप- मुख्तारला दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी मुख्तारला पोट आणि लघवीचा संसर्ग झाल्याची माहिती सांगितली होती. त्यावेळी जेलचे डीजी एसएन सबत यांनी मुख्तारची प्रकृती गंभीर नसल्याचा दावा केला होता. त्यावर काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची भीती मुख्तारच्या वकिलांनी व्यक्त केली होती. मुख्तारनं १९ मार्च रोजी दिलेल्या अन्नामध्ये विषारी पदार्थ मिसळल्याचा तुरुंग प्रशासनावर आरोप केला होता.
हेही वाचा-