पणजी Missing Nepali Girl : नेपाळच्या महापौरांची 36 वर्षीय तरुणी गोव्यातून बेपत्ता झाली होती. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण गोव्यात जलद शोधमोहीम सुरू करुन तरुणीचा शोध घेतला. ही तरुणी तिच्या दोन मैत्रिणींसोबत गोव्यातील एका हॉटेलमध्ये सापडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. ही मुलगी महिनाभरापूर्वी इथं ओशो ध्यान केंद्रात आली होती. ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच नेपाळमधून तिचं कुटुंबीयही आलं होतं.
बेपत्ता तरुणीचा पोलिसांनी घेतला शोध : आरती हमाल ही नेपाळची रहिवासी आहे. ती मंगळवारपासून बेपत्ता होती, असं पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या अहवालात म्हटलंय. ही तक्रार मिळताच मांद्रेम पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. पोलिसांच्या अनेक पथकांनी गोव्यातील रुग्णालयं आणि विविध हॉटेल्सची तपासणी केली. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी बेपत्ता तरुणीचा शोध घेतला. ती चोपडेम पेरनेम गोव्यात सापडली.
तक्रारीनंतर 12 तासांत सापडली मुलगी : उत्तर गोव्याचे एसपी अक्षर कौशल यांनी सांगितलं की, ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून मांद्रे, गोव्यात राहात होती. मंगळवारपासून ती बेपत्ता होती. तक्रारीच्या आधारे, आम्ही हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर सुमारे 12 तासात तरुणी सापडली. आरती हमाल नावाची ही मुलगी नेपाळच्या महापौरांची मुलगी असल्याचं सांगण्यात येतंय. आरती गेल्या काही दिवसांपासून उत्तर गोव्यातील अश्वेम येथील जोरबा वाइब्स हॉटेलमध्ये थांबली होती. नेपाळच्या महापौरांनी मुलगी गोव्यात बेपत्ता झाल्यानं कृपया तिला शोधण्यात मदत करा, अशी पोस्ट सोशल मीडियावर केली होती.
तरुणी गेली ओशो सेंटरमध्ये : एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, उत्तर गोव्यातील मंद्रेम येथून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आहे. ती महिनाभरापूर्वी नेपाळमधून ओशो ध्यान केंद्रात आली होती. तक्रार आल्यानंतर मुलीचा शोध घेण्यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली. आरती हमाल अनेकदा गोव्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरतीनं तिचा फोन ओशो सेंटरमध्ये सोडला होता. त्यामुळं पोलिसांना तो शोधण्यात अडचण आली. बुधवारी आरती हमाल तिच्या मैत्रिणी असलेल्या दोन महिलांसोबत चोपडेम गावातील एका हॉटेलमध्ये आढळून आली. पोलीस आरतीचा जबाब नोंदवत आहेत. आरती बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच तिचं कुटुंबीयही गोव्यात पोहोचलं आहे.
हेही वाचा :