तमिळनाडू (कल्लाकुरुची) Fake Liquor: तामिळनाडूतील कल्लाकुरिची शहरात मंगळवारी रात्री बनावट दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक लोकांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, शहराच्या हद्दीतील करुणापुरम येथे मंगळवारी रात्री रोजंदारी कामगारांच्या एका गटाने बनावट दारू घेतली होती. मृतांची संख्या आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
उलट्या, मळमळ, पोटदुखीचा झाला त्रास : घरी पोहोचल्यावर, बहुतेकांना चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि डोळ्यांत जळजळ होण्याचा त्रास सुरू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कल्लाकुरीची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेलं. त्यावेळी वैद्यकीय उपचार सुरू असताना त्यांच्यापैकी 25 जणांचा मृत्यू झाला. 60 हून अधिक लोकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. 10 हून अधिक लोकांना चांगल्या उपचारांसाठी पुद्दुचेरी येथील जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (जिपमेर) येथे पाठवण्यात आलं आहे.
बनावट दारू बनवण्यासाठी मिथेनॉलचा वापर : रक्ताचे नमुने गोळा करून ते विल्लुपुरम आणि जिपमेर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. चाचणीच्या निकालांमध्ये मिथेनॉल मिसळल्याचं आढळून आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मंत्री ई.व्ही. वेलू आणि एम. सुब्रमण्यन यांनी कल्लाकुरिची रुग्णालयात जाऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी श्रावण कुमार जदवत यांची बदली करण्यात आली आहे.
कल्लाकुरीच्या पोलीस अधीक्षकाची नियुक्ती : एमएस प्रसाद यांची कल्लाकुरिचीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कल्लाकुरीची जिल्हा पोलीस अधीक्षक समई सिंह मीना यांना पदावरून हटवून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर रजत चतुर्वेदी यांची कल्लाकुरीची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, जिल्हा दारूबंदी अंमलबजावणी युनिटशी संबंधित पोलीस उपअधीक्षक तामिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सीबीसीआयडीला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा -